Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ, युवासेनेने जिंकल्या दहाच्या दहा जागा, 100 टक्के स्ट्राईक रेट
Mumbai University Senate Election 2024 : ठाकरे गटाच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील आपलं वर्चस्व कायम ठेवलं असून दहाच्या दहा जागांवर विजय मिळवला आहे.
मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं दिसून आलं. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहाच्या दहा दहा जिंकून भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा धुव्वा उडवला आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतंय.
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांनी पाच हजारांच्या वर मतं घेतली. तर त्याचवेळी ABVP च्या उमेदवार हे हजारांच्या आतच गुंडाळल्याचं दिसून आलं.
विजयी उमेदवार
- मयुर पांचाळ - युवासेना - 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
- शितल देवरुखकर शेठ - 5498 मते- SC प्रवर्ग
- डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते - ST प्रवर्ग
- स्नेहा गवळी- महिला
- शशिकांत झोरे - NT प्रवर्ग
- प्रदीप सावंत - खुला प्रवर्ग
- मिलिंद साटम - खुला प्रवर्ग
- अल्पेश भोईर - खुला प्रवर्ग
- परमात्मा यादव - खुला प्रवर्ग
- किसन सावंत - खुला प्रवर्ग
हा निकाल म्हणजे सुरुवात
युवासेनेचे दहाच्या दहा उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होताच आदित्य ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "सिनेटचे निकाल आपण पाहात आहात. सरकारने निवडणुकीत अडथळे निर्माण केलेत. ते निवडणुका हरतील त्यामुळेच कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील घेत नाहीत. जे विजयी झालेत त्यांचे अभिनंदन. मतदार राजाने आम्हाला साथ दिली. निवडणुका थांबवण्यासाठी मिंधेकडून सातत्याने प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. यासाठी कोर्टाचे आभार मानतो. हा निकाल सुरुवात आहे आणि असाच विजय महाविकास आघाडी प्राप्त करेल."
पाच आरक्षित जागांवर उमेदवारांना मिळालेली उमेदवारांना मते
महिला प्रवर्ग
युवासेना स्नेहा गवळी- महिला- 5914 मते
अभाविप - रेणुका ठाकूर -893
SC प्रवर्ग
युवासेना -शीतल शेठ देवरुखकर - 5489
अभाविप -राजेंद्र सायगावकर - 1014
OBC प्रवर्ग
युवासेना मयूर पांचाळ - 5350
अभाविप राकेश भुजबळ - 888
ST प्रवर्ग
युवासेना धनराज कोहचडे - 5247
अभाविप -निशा सावरा - 924
NT प्रवर्ग
युवासेना शशिकांत झोरे - 5170
अभाविप -अजिंक्य जाधव - 1066
एकूण 28 उमेदवार रिंगणात
मतपत्रिकांची छाननी झाल्यानंतर आणि मतपत्रिका वैध-अवैध ठरवल्यानंतर पसंती क्रमांक नुसार मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये 7200 पैकी 6684 मतपत्रिका यावेळी वैध ठरल्या. खुल्या प्रवर्गासाठी साधारणपणे 1114 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.
सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते. ते भाजपप्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही दहा उमेदवार दिले होते. इतर आठ उमेदवार धरून या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
निवडणुकीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
सिनेट निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला. बोगस पोलिंग एजंट प्रकरणात विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवारला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. एका ठिकाणच्या गोंधळावरून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. अभाविपकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.
नवी मुंबईत सिनेट निवडणुकीदरम्यान पकडल्या गेलेल्या बोगस पोलिंग एजंट प्रकरणी अभाविपने हायकोर्टात धाव घेतली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचा उमेदवार अल्पेश भोयर याला अपात्र ठरवत त्याला पडलेली मतं रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सिनेट निवडणुकीच्या आधी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या अधिकृत पोलिंग एजंट ऐवजी भलतीच व्यक्ती उपस्थित राहिल्याचा अभाविपचा आरोप होता. भोईर यांचा पोलिंग एजंट स्वप्नील सरवदे होता. मात्र उपविधानसभेचे ऐरोली युवासेना प्रमुख स्वप्नील मढवी तिथं हजर होते. त्यामुळे अल्पेश भोईर यांना मिळालेली मतं ग्राह्य धरली जाऊ नयेत अशी हायकोर्टाकडे मागणी करण्यात आली होती.