Sanjay Raut: तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Sanjay Raut On Raj Thackeray: विक्रोळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संजय राऊत बोलत होते.
Sanjay Raut On Raj Thackeray मुंबई: तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे राहा...दिल्लीचे बूट चाटू नका, देवेंद्र फडणवीसांची पालखी वाहू नका, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केली आहे. विक्रोळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संजय राऊत बोलत होते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे इकडे येऊन बोलले की, इकडे भिकारडा संपादक राहतो. बरोबर आहे...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र येवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदींचे आपण पाय चाटताय...बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणतात, यावरुन तुमचं बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेम दिसून येतं, असं संजय राऊत म्हणाले. ज्या सामनाने या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या अस्मितेची लढाई मी 35-40 वर्षे लढत राहिलो. ही मळमळ तुम्ही इकडे येऊन बाहेर काढली. त्यांचं असं म्हणणं आहे की मी ठाकरे आहे, तर आम्ही देखील राऊत आहोत. बाळासाहेबांनी घडवलेले राऊत आहोत. तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे राहा...दिल्लीचे बूट चाटू नका, देवेंद्र फडणवीसांची पालखी वाहू नका, अशी माझी विनंती आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
तुमची खु्र्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी- संजय राऊत
एका सभेत त्यांनी माझ्या नावाची खाली खुर्ची ठेवली. मला यामागचं कारण समजलंच नाही. राज ठाकरेंसमोर माझ्या नावाची खुर्ची ठेवली, सन्मानीय संजय राऊत वैगरे...मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेऊया, कारण 23 तारखेला त्यांची खाट टाकणारचं आहोत. तुमची खु्र्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी...खटाखट...असं मिश्किल विधानही संजय राऊतांनी केलं. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्ही आमची निष्ठा विकली नाही, आम्हाला ईडीने अटक केली म्हणून आम्ही गांडू सारखं वागलो नाही. आमच्यावर देखील दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा..परंतु आम्ही तुरुंगात जाताना ज्या रुबाबात गेलो, त्याच रुबाबात बाहेर आलो...फगवा फडकवत, असं संजय राऊतांनी सांगितलं. तुम्हाला एकदा ईडीने काय बोलावलं, तुम्ही दोन वर्षे कोमात गेलात. तुम्ही ठाकरे आहात म्हणतात ना, म्हणून तु्म्हाला हे नम्रपणे सांगतोय, असं संजय राऊतांनी सांगितले.