विधानसभेसाठी मविआचे 2 उमेदवार ठरले, संजय राऊतांनी नावं सांगितली, निलेश लंकेंच्या पत्नीच्या नावाची घोषणा!
Sanjay Raut : शिवसैनिकांना चांगले दिवस आले असून लोकसभेत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे आता विधानसभेतही हीच जादू चालणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की , शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले असून लोकसभेत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे आता विधानसभेतही हीच जादू चालणार असून शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधानसभेत जातील. संजय राऊतांनी लंके आणि पाचपुते यांच्याबाबत असे वक्तव्य करून जणू काही श्रीगोंद्याचा विधान सभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला असेच म्हणता येईल.
पुढचं सरकार महाविकास आघाडीचं
शिवसेनेचे असे कार्यालय श्रीगोंद्यात होईल असे मला वाटले नव्हते. मात्र साजन पाचपुते यांच्यामुळे झाले. आता या श्रीगोंद्यात शिवसेनेचा आमदार होईल असे वातावरण तयार झाले. आता अहमदनगर जिल्हात शिवसेनेला चांगले दिवस आले, एक शिवसैनिक खासदार झाला भले त्याच्या हातात तुतारी ( निलेश लंके यांना उद्देशून) असली तरी तो शिवसैनिक आहे. या राज्यातील पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं आहे. फडणवीस म्हणत होते 10 जागा निवडून आणा मात्र तेच दाहाच्या आत आले, असे संजय राऊत म्हणाले.
लोकसभेत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, मात्र लोकांनी इनाम ठेवला आणि लंके यांना निवडून दिलं. लंके ताई निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीत शपथ घेतली, आता तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार, असे म्हणत संजय राऊत यांनी सूचक इशाराच दिला.
संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
राजकारणात किती खोटेपणा असावा याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची चोरी आहे...मात्र राजकारण करत असताना आपण खोट बोलायचं नाही खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिला आहे...असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला ते अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे बोलत होते.
महाराष्ट्राने जागा दाखवून दिली -
नरेंद्र मोदी म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्राने जागा दाखवून दिली. आता नकली पाचपुते यांना हटवायचं आणि असली पचपुते यांना आणायचं आहे. इथल्या आमदारांनी काय काम केले, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, खासदार निलेश लंके यांनी आता पाणी प्रश्न हाती घेतला आहे. हात जोडून काम नाही झालं तर हाथ सोडून काम करावं लागते. हे राज्य गुजरातला आम्ही विकलं नाही, मोदी आणि अमित शहा यांना वाटतं असेल आम्ही दिल्लीत बसून महाराष्ट्र हवे तसे वागू. मात्र कालचा निकाल आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. मुंबईतील अनेक उदयोग गुजरातला घेऊन गेले, पाठीत खंजीर खुपसला, असे संजय राऊत म्हणाले.
भाव कोणाला आहे तर शंभर कोटीला खासदार विकले गेले, कालच्या विधानसभेत एक मत 25-25 कोटींना विकत घेतलं. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, आता विधानसभेतील सरकारला मतदारांनी सरकार लाथळलं पाहिजे. हा जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील, आता साजन पाचपुते तुम्ही थांबू नका आता गाव तिथे शाखा खोला, असे संजय राऊत म्हणाले.