Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
Sada Sarvankar in Mahim Vidhan Sabha: सदा सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्याविरोधात माघार घेण्यास नकार दिला होता. माहीम विधानसभेत काँटे की टक्कर
मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर सध्या मनसेच्या (MNS) नेत्यांकडून चौफेर टीका सुरु आहे. राज ठाकरे यांनी स्वत:ही सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले होते. या सगळ्यावर आता सदा सरवणकर यांनी भाष्य केले आहे. निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांवर टीका होत असते. राज ठाकरे (Raj Thackeray) माझ्याबाबत बोलले असतील. मी त्यांना आदरपूर्वकच बघतो, अशी काहीशी मवाळ भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. त्यांनी म्हटले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून कुठलीही आंदोलनं केली नाहीत. त्यावेळी मला बाजूला ठेवून घरगडी उभा केला जायचा. त्यावेळी अन्याय होत होता, ही भावना होती. अन्यायाला वाचा फोडली. संदीप देशपांडे यांनी मी उमेदवारी मागे घेतली नाही, यावरुन टीका केली. पण ते माझे मित्र आहेत. आपण चॅनेलवर होता काय प्रेशर होतं हे तुम्ही पाहिलं आहे. माझी काय अंड्डीपिल्ली आहेत, ते सांगतील मी काय सांगू?, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.
भाजपच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया
भाजपचे कोणतेही नेते इथे आता माझासोबत कोणी नाही. प्रत्येक पक्षाचे धोरण वेगळे असते. पण भाजपचे पदाधिकारी माझासाठी आजही फिरत आहेत, असे सदा सरवणकर यांनी सांगितले. मोदींच्या सभेवर महेश सावंत यांनी बोलणे म्हणजे तो विचारवंत आहे, त्यावर काय बोलायचं? राज ठाकरेंनी पर्सनली माझ्याशी संवाद साधलेला नाही, हे खरयं. मी समाधानला पाठवलं होतं ते म्हणाले, जे योग्य वाटतयं ते करा, मला भेटायचं नाही, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.
यावेळी सदा सरवणकर यांनी भाजपच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर प्रतिक्रिया दिली. मला भाजपच्या जाहिरातीबाबत माहिती नाही, पण माहीम मतदारसंघातील मुस्लिम माझ्यासोबत आहेत, असे सदा सरवणकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो; राज ठाकरेंनी ठणकावले, माहीममध्ये काय बोलले?