(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युतीचे आजचे उद्योग पाहिले तर लहानपणीची सर्कस आठवते : रोहित पवार
"कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे. भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता", अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपसोबतच्या युतीवरुन शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. युतीचे आजचे उद्योग पाहिले तर लहानपणीची सर्कस आठवते, अशा शब्दात रोहित पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून युतीवर निशाणा साधला आहे.
"कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे. भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता", अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
मात्र सध्याच्या बदलेल्या परिस्थितीबद्दल बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं. काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली. पाच वर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणत मगरीचे अश्रू ढाळले आणि आता मुद्दे सोडून व्यक्तिगत टीका करु लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचं सख्य आठवलं की काळीज, कोथळा, वाघनखे हे शब्द आजही आठवतात."
"युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देऊन किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होत आहे. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल", अशी टीका रोहित पवारांनी केली.
रोहित पवारांची टीका शिवसेनेनला नक्कीच झोंबणार आहे. मात्र रोहित पवारांना शिवसेना कसं उत्तर देणार की दुर्लक्ष करणार हे लवकरच समोर येईल.