...तर औरंगाबाद लोकसभेतून माघार घ्यायला तयार : सुभाष झांबड
उमेदवारी जाहीर न झाल्याने काँग्रेसचे सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमधील नाराजीनाट्यावर येथील काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांच्यासाठी माघार घ्यायला तयार असल्याचं झांबड यांनी म्हटलं आहे.
"अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद लोकसभा लढवायची असेल, तर मी माघार घ्यायला तयार आहे. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढवावी, त्यांनी बंडखोरी करण्याची गरज नाही", अशी प्रतिक्रिया सुभाष झांबड यांनी दिली.
काँग्रेसचे सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती.
त्यामुळे काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार त्यांनी म्हटले आहे.