Rajasthan Election Result Live : राजस्थानात वसुंधरा राजे नव्हे तर बालकनाथ की आणखी कोणी? भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?
Rajasthan Assembly Election Results : भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता ही निवडणूक लढवली होती.
Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल (Rajasthan Assembly Election Results) पाहिल्यास भारतीय जनता पक्ष (BJP) 111जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे, सुरुवातीच्या ट्रेंडचे रुपांतर निवडणुकीच्या निकालात झाल्यास भाजप पूर्ण बहुमताने राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता ही निवडणूक लढवली होती. वसुंधरा राजे (Vasundhara Raje) 2003 पासून राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. मात्र, यावेळी पक्षाने त्यांचा चेहरा पुढे करण्यास टाळले असल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत अनेक चेहऱ्यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि महंत बालकनाथ योगी (Mahant Balaknath) यांच्या नावाची चर्चा असली तरीही, भाजप आणखी कोणता नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
राजस्थान निवडणुकीचे कल समोर येत असताना भाजपचं सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे. वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार की पक्ष नव्या चेहऱ्याला संधी देणार? याबाबत देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपने विधानसभा निवडणुकीत अनेक खासदारांना मैदानात उतरवल्याने नवीन चेहरा दिला जाण्याची चर्चा होत आहे. त्यातच, राजस्थानमध्ये भाजपचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय चेहरा असलेल्या वसुंधरा यांचा आलेखही घसरला आहे. त्यातच, खासदार असलेल्या महंत बाबा बालकनाथ योगी यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत उतरवले असून, त्यांच्या नावाची देखील मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे.
महंत बाबा बालकनाथ योगी : तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालकनाथ हे भाजपचे खासदार आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये 10 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ यांना पहिली पसंती दिली होती. या एक्झिट पोलनुसार बालकनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय चेहरा असल्याचे समोर आले होते.
दिया कुमारी : जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी यांच्याकडेही वसुंधरा राजे सिंधियाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. दिया कुमारी या खासदार असून यावेळी भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली होती. दिया कुमारी यांनी जयपूर जिल्ह्यातील विद्याधर नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानली जाते. माजी उपाध्यक्ष आणि राजस्थान भाजपचे वरिष्ठ नेते भैरो सिंह शेखावत यांचे नातेवाईक नरपत सिंह राजवी हे या मतदारसंघातून भाजपकडून मैदानात असायचे. पण, यावेळी पक्षाने नरपत यांची जागा बदलली. त्यांच्या, जागी दिया कुमारी यांना उमेदवारी देऊन सुरक्षित जागेवरून रिंगणात उतरवल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे की, वसुंधरा राजे यांना पर्याय म्हणून दिया कुमारी यांना संधी दिली जाऊ शकते.
सीपी जोशी : राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी हे देखील सीएमच्या शर्यतीत सामील असल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सीपी जोशी यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा आघाडीने सांभाळला. सीपी जोशी हेही खासदार असून त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवल्याने त्यांची हायकमांडशी जवळीक असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
'या' नेत्यांच्या नावाची देखील चर्चा..
राजस्थानमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा यांच्याशिवाय आणखी तीन नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू असून, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी यांच्यासह अन्य काही नेत्यांचाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत समावेश असल्याचे मानले जात आहे. अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव किंवा सुनील बन्सल यापैकी कोणत्याही बलाढ्य नेत्यांना भाजप नेतृत्व करण्यासाठी संधी देऊ शकते. अनेक जाहीर सभांमध्ये पीएम मोदींनी अर्जुनराम मेघवाल यांचे नाव ज्या पद्धतीने घेतले, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावाही मजबूत मानला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: