Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून (Phalodi Satta Bazar) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला (Mahaviaks Agahdi) पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी सट्टा बाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फेल ठरला होता. (Maharashtra Elections 2024)
आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.
याशिवाय, झारखंडमध्येही भाजपला 55 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. यापैकी 55 जागांवर मिळाल्यास भाजपला झारखंडमध्ये एकहाती सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आता फलोदी सट्टा बाजाराचे हे अंदाज महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कितपत खरे ठरणार, हे आता 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. दरम्यान, मतदानाला अवघे काही तास उरल्याने आता महाराष्ट्रातील उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. उद्या राज्यात किती टक्के मतदान होते, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
महाराष्ट्रात मतदानाची जय्यत तयारी
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. त्यासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 204 महिलांसह 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील तब्बल 9 कोटी मतदारांसाठी 1 लाख 427 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
आणखी वाचा