राहुल गांधींचा लढण्याचा अधिकारच काढून घ्यायला हवा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर टीका करत असताना मेहबुबा मुफ्ती यांना चोमडेगिरी करण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
कल्याण : जे लोक देशद्रोहाचं कलम काढून टाकण्याची भाषा करत असतील, त्यांचा निवडणूक लढण्याचा अधिकारच काढून घ्यायला हवा, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. कल्याणमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
देशाची सुरक्षा हा देशातील प्रत्येकासाठी सर्वोच्च मुद्दा असला पाहिजे. मात्र सध्या काही लोक काश्मीरमधला कलम 370 कलम काढून टाकण्याची भाषा करत आहेत. देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याची भाषा करणाऱ्या अशा लोकांचा निवडणूक लढण्याचा अधिकारच काढून घ्यायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या चक्की नाका परिसरात जाहीर सभा घेतली. यावेळी पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
आपले पंतप्रधान पाकिस्तानवर टीका करत असताना मेहबुबा मुफ्ती यांना चोमडेगिरी करण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भारत पाकिस्तानचा वाद सुरू असताना आपण भारताचे पंतप्रधान आणि सैन्याच्या बाजूने उभं राहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. कल्याणमधील या सभेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना, भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.