Punjab : पंजाब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; 17 पैकी 10 मंत्री शपथ घेणार
Punjab News : आज पंजाब मंत्रिमंडळाचा शपथविधी. 17 पैकी 10 मंत्री शपथ घेणार आहेत.
Punjab News : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. पंजाबच्या मंत्र्यांचा शपथविधी 19 मार्च रोजी म्हणजेच, आज सकाळी 11 वाजता होणार आहे. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर भगवंत मान यांची पहिली कॅबिनेट बैठक पंजाब सचिवालयात 12.30 वाजता होणार आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 10 आमदारांची नावं आणि फोटो ट्विटरवर शेअर केली आहेत. नवीन मंत्रिमंडळ आज शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडेल. पंजाबच्या आप सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंत्र्यांना खूप-खूप शुभेच्छा. पंजाबच्या जनतेने आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. रात्रंदिवस मेहनत करून जनतेची सेवा करायची आहे. पंजाबला प्रामाणिक सरकार द्यायला हवं. आपल्याला पंजाबचा विकास करायचा आहे.
दरम्यान, ABP न्यूजनं सर्वात आधी सांगितलं होतं की, 19 मार्च रोजी पंजाब कॅबिनेटच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मंत्र्यांपैकी सध्या 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री
पंजाबच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यावेळी ते म्हणाले होते की, ''भगत सिंहजी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पक्ष लढत आहे. भगवंत मान म्हणाले की, ''चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारेल. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू.''
दरम्यान, भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री असू शकतात, असं सांगण्यात येत आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 जागांपैकी आपने 92 जागा जिंकल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :