(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Lok Sabha Result 2024: मला कोथरुडमध्ये पडणारी मतं पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, निकालापूर्वी रवींद्र धंगेकरांचं सूचक वक्तव्य, पुण्यात चमत्कार होणार?
Pune Lok Sabha Result 2024: पुण्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना विजयाची खात्री आहे.
Pune Lok Sabha Result 2024: पुणे: देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात निकाल नेमका कोणाच्या पारड्यात जातो, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. दुसरीकडे मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, थोड्याच वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी अडीचपर्यंत निकाल हाती येणार आहे. पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election Result) अत्यंत चुरशीची असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
पुणे लोकसभेच्या निकालाआधी महायुती आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. पुण्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना विजयाची खात्री आहे.
लढणारा माणसाचा विजय होत असतो, हा माझा अभ्यास आहे. गेले दोन-तीन महिने मी पुणे शहरात काम करतोय आणि गेल्या 30 वर्षांपासून पुणेकरांसोबत माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळे मला निवडणुकीची आजपर्यंत भीती वाटली नाही, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
कोथरुड मला जी मतं पडतील त्यावरुन सर्व आश्चर्यचकित होतील- रवींद्र धंगेकर
पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. तसेच एक्झिट पोल्सनूसार महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी होत आहेत, असं दिसून येत आहे. यावर देखील रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोल्स एक अंदाज आहेत, निकाल नाही. मुरलीधर मोहोळ यांनी गुलाल मागवला आहे, त्यांचे खासदार म्हणून अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत, असं विचारल्यास त्याच बॅनरवर माझे फोटो लागलेले दिसतील, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली. फक्त दोन फेऱ्या होऊद्या, मग समजेल. तसेच कोथरुडमधून मला किती मतं पडेल, यावरुन भाजप आणि पत्रकारांना आश्चर्य वाटेल, असं सूचक विधानही रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे.
वसंत मोरेही रिंगणात-
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासोबत मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली.
पुण्यात किती टक्के मतदान झालं?
पुणे लोकसभा मतदानाची टक्केवारी 53.54 - टक्के
- वडगाव शेरी - 51.71 टक्के
- शिवाजीनगर - 50.67 टक्के
- कोथरूड - 52.43 टक्के
- पर्वती - 55.47 टक्के
- पुणे कॅन्टोन्मेंट - 53.13 टक्के
- कसबा पेठ - 59.24 टक्के
पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात 20,61,276 मतदारांपैकी 11,03,678 पुणेकरांनी मतदान केलं आहे. त्यात 10,57,877 पुरुष मतदारांपैकी 5,84,511 म्हणजेच 55.25 टक्के एकूण पुरुषांनी मतदान केलं आहे. तर 10,03,075 महिला मतदारांपैकी 5,19,078 म्हणजेच एकूण महिलांपैकी 51.75 टक्के महिलांनी मतदान केलं आहे. इतर मतदारांपैकी (तृतीयपंथी) 324 पैकी 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पुणे 2019 सालचा निकाल -
गिरीश बापट - भाजप - 6,32,835
मोहन जोशी - काँग्रेस - 3,08,207
वंचित - अनिल जाधव - 64,793