Chinchwad Bypoll Election : पेड न्यूज प्रकरणी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Chinchwad Bypoll Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. पेड न्यूज प्रकरणात ही नोटीस दिल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Chinchwad Bypoll Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा (Pune Bypoll Election) उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस धाडली आहे. पेड न्यूज (Paid News) प्रकरणात ही नोटीस दिल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
विशेष समितीकडून पडताळणी
पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरुन भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एका वेबसाईट आणि साप्ताहिकामध्ये एक बातमी आलेली आहे, त्यातील मजकूर हा पेड न्यूज सदृश्य असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसीने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यानुसार अश्विनी जगताप यांना 16 फेब्रुवारीला नोटीस धाडण्यात आली असून 20 फेब्रुवारीला त्यांचा खुलासा आल्याचंही बोललं जात आहे. हा खुलासा आता एमसीएमसी समितीकडे पाठवण्यात आलेला आहे. आता ही समिती पडताळणी करुन पुढील कारवाई निश्चित करणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.
चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत
चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि सगळीकडे सध्या ज्या उमेदवाराची चर्चा सुरु आहे आणि ज्या उमेदवाराने राष्ट्रवादी आणि भाजपचं टेन्शन वाढवलं आहे असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. या तिघांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तिघांकडूनही प्रचारासाठी मोठ मोठे नेते येत आहेत. रॅली, सभा, पदयात्रा काढल्या जात आहे. या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक असल्याने सर्वपक्षीय नेते प्रचारासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.
VIDEO : Ashwini Jagtap Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार आश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस
हेही वाचा