Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : दिल्लीला 45 पारचा आकडा दिला, त्यावर मोदींनी 400 पार दिला अन् तोंडघशी पडले: पृथ्वीराज चव्हाण
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधून मोकळं करावं, ही विनंती पक्षनेतृत्वाला करत आहे, असं म्हटल्यानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP Defeat in Maharashtra Lok Sabha Election Result) जे अपयश आलेलं होतं त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्य सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती पक्षनेतृत्त्वाला केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. “भाजपच्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. मला आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी म्हणून मला राज्य सरकारमधून मोकळं करावं, ही विनंती पक्षनेतृत्वाला करत आहे.” ,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. काँग्रेसचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला होता त्याची जबाबदारी कुणीतरी घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटलं.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यापुढे म्हटलं की, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला त्यांनी 45 पारचा आकडा दिला होता, तो आकडा गृहित धरुन तिथं मोदींनी चारशे पारची घोषणा केली आणि मोदी तोंडघशी पडले. कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीला जायचं असेल तर काही तरी कोर्स करेक्शन करावं लागेल. त्यांना निवृत्त करतात की नाही, त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
ऑल इज नॉट वेल हे मला सांगता येणार नाही. सकृतदर्शनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला मिस लीड केलं, खूप आशादायक चित्र निर्माण केलं त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. त्यामुळं मला वाटतं कुठतरी भाजपचा ग्राऊंड रिअलिटीचा टच संपलेला आहे. त्यांनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं, त्याला नरेंद्र मोंदींचा थेट आशीर्वाद मिळवला, त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, त्याचं विश्लेषण करतील हे माहिती घ्यावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
एकदंरित सर्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या रचनेत बदल होणारे, मुख्यमंत्रिपद बदललं जाणार आहे. फक्त देवेंद्रजी पक्षाची जबाबदारी घेऊन पुढं जातील, त्यांना सत्तेतून मुक्त करणारेत का हे भाजप ठरवेल. काही तरी चुकलंय याची जाणीव त्यांना झाली हे बरं झालं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
देवेंद्रजी बाहेर पडले तर तिथं कोण येणार: पृथ्वीराज चव्हाण
आता मात्र सरकारपुढं दुष्काळ हाताळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. आचारसंहिता संपलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या दु:खाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आता असं आहे की निवडणुका दोन महिन्यात जाहीर होतील. त्यामुळं सरकारमध्ये फार दम राहिलेला नाही. परंतु, कुणाच्या नेतृत्त्वाखाली जायचं हा मोठा प्रश्न आहे, भाजपला त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळातून देवेंद्रजी बाहेर पडले तर तिथं पर्याय कोण येणार, त्याला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल की त्याला मुख्यमंत्रिपद दिलं जाईल हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदेंना विधानसभेला सामोरं जाण्याची जबाबदारी टाकली जाईल, कारण हे एकनाथ शिंदे यांचं देखील अपयश आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती