पाच वर्षात काय केलं? बीडमध्ये प्रचारदरम्यान भाजप आमदार संगीता ठोंबरेंवर नागरिकांकडून प्रश्नांचा भडिमार
बीडमध्ये प्रचारासाठी आलेल्या संगीता ठोंबरे यांना विकास कामे, निधी, पीक विमा, रस्त्यांची कामे यासंबधीचे प्रश्न विचारण्यास नागरिकांनी सुरुवात केली. यावेळी सभेत गोंधळ देखील उडाला.
बीड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नेते मंडळी रस्त्यावर उतरले आहेत, भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी नेते मंडळींना जनतेच्या नाराजीला सारोरं जावं लागत आहे. बीडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.
भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी केज तालुक्यातील माळेगावमध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी एका सभेत गावातील नागरिकांना ठोंबरे यांचा सत्कार केला. मात्र त्यानंतर पाच वर्षात काय असा सवाल नागरिकांनी त्यांना विचारण्यास सुरुवात केली. विकास कामे, निधी, पीक विमा, रस्त्यांची कामे यासंबधीचे प्रश्न विचारण्यास नागरिकांनी सुरुवात केल्याने सभेत काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
लोकांनी अचानक प्रश्नांची सरबत्ती केल्याने संगीता ठोंबरे यांना काय उत्तर द्यावं हेच सूचत नव्हतं. मात्र लोकांचे प्रश्न थांबत नसल्याचं पाहून संगिता ठोंबरे काहीशा संतापलेल्या दिसल्या. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, मात्र लोक काहीही ऐकण्यास तयार नव्हते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या प्रकारातून लोकांमधील आमदारांवरची नाराजी समोर आली आहे.