Parbhani Nagarparishad Election Result 2025: परभणीत 'या' नेत्यांना होम ग्राउंडमध्येच धक्का; पुढारीपुत्रांना मतदारांनी बसवले घरी; कोणाला स्विकारलं, कोणाला नाकारलं?
परभणीत नगरपरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी पुढाऱ्यांच्या मुलांना नाकारत होमग्राउंडवर धक्का दिलाय.

Parbhani Nagarparishad Election Results 2025: परभणी जिल्ह्यात पार पडलेल्या 7 नगरपरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी नेत्यांना त्यांच्या होम ग्राउंडमध्येच धक्का दिलाय. पाथरीत मागच्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसच्या बाबाजानी दुर्रानी यांच्या मुलाचा पराभव झाला. सोनपेठमध्ये अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे तिन्ही नेत्यांना मोठा धक्का मानला जातोय..
बाबाजानी दुर्रानी यांच्या चिरंजीवाचा पराभव
परभणीच्या पाथरी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्रानी यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरवले होते. मागच्या 35 वर्षापासून बाबाजानी यांची पाथरी नगर परिषदेवर एकहाथी सत्ता होती. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आसेफ खान यांनी बाबाजानी यांचे चिरंजीव जुनेद खान यांचा पराभव केलाय.
राजेश विटेकरांनाही होम ग्राउंडमध्ये धक्का
तसेच पाथरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. तिकडे सोनपेठमध्येही मागच्या 25 वर्षापासून चंद्रकांत राठोड यांची नगरपरिषदेवर सत्ता होती. सोनपेठ हे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांचे शहर. इथे राजेश विटेकरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून चंद्रकांत राठोड यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केले होते. मात्र, त्यांना नवख्या असलेल्या शहर विकास आघाडीच्या परमेश्वर कदम यांच्याकडून पराभव पत्करावा लागलाय.
गंगाखेडच्या मतदारांनी रत्नाकर गुट्टेंना नाकारलं
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही यावेळी महायुतीसोबत न जाता वेगळी चूल मांडत स्थानिक शहर विकास आघाडी करून सौ. निर्मलाताई तापडिया यांना नगराध्यक्ष पदासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून उभे केले होते. मात्र, तिथेही रत्नाकर गुट्टे यांना नाकारत गंगाखेडच्या मतदारांनी सौ उर्मिला केंद्रे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांना विजयी केले आणि गुट्टेंना मोठा धक्का दिला आहे..
कोणत्या नेत्यांची मुलं विजयी, कोणाचा पराभव?
-परभणी जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांमध्ये पाथरी नगरपरिषदेमध्ये काँग्रेसचे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी त्यांचे चिरंजीव जुनेद खान यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरवले होते. मात्र त्यांना जनतेने स्वीकारले नाही.
-दुसरीकडे जिंतूर नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळेला नगरसेवक पदासाठी उभे केले होते. मात्र, तिथेही त्यांचा पराभव झाला आहे.
-अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी सौ उर्मिला केंद्रे या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या. तर त्यांचा भाचा मिथिलेश केंद्रे हा नगरसेवक पदासाठी निवडून आलाय. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीमध्ये या दोघांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.




















