एक्स्प्लोर
परभणीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे राष्ट्रवादी पुढे आव्हान, मेघना बोर्डीकरांच्या एन्ट्रीने निवडणुकीत रंगत!
आधी काँग्रेस नंतर शेकापचा गड असलेला परभणी लोकसभा मतदार संघ 1989 ला शिवसेनेने अशोक देशमुख यांच्या रुपाने काबीज केला. त्यासोबतच मराठवाड्यातून शिवसेनेचा पहिला खासदार दिल्लीत गेला. हेच यश शिवसेनेनला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारेही ठरले
पक्षांतराच्या शापातून यावेळी विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या रुपाने मुक्त झालेली परभणीची शिवसेना लोकसभेत 30 वर्षाचा गड शाबूत ठेवणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा हा जिल्हा भलेही उद्योग नसणारा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी भावनिकतेच्या मोहात इथे सेनेने सत्ता राखली आहे. त्यामुळे सेनेच्या या तटबंदी किल्ल्याला पोखरून काढण्याचे कडवे आव्हान यंदाही राष्ट्रवादी समोर आहे.
आधी काँग्रेस नंतर शेकापचा गड असलेला परभणी लोकसभा मतदार संघ 1989 ला शिवसेनेने अशोक देशमुख यांच्या रुपाने काबीज केला. त्यासोबतच मराठवाड्यातून शिवसेनेचा पहिला खासदार दिल्लीत गेला. हेच यश शिवसेनेनला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारेही ठरले. 1989 ते 2019 या 30 वर्षात 1998 ला 16 महिन्यांकरीता हा मतदार संघ काँग्रेसकडे गेला, हा अपवाद वगळता आजपर्यंत शिवसेनेकडे असेलला हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळवता आला नाही, हे विशेष.
दोन वेळेस शिवसेनेकडून खासदार राहिलेले अशोकराव देशमुख, सुरेश जाधव, यांच्यासह तुकाराम रेंगे पाटील, गणेशराव दुधगावकर या चारही खासदारांनी शिवसेना सोडली. आणि इतर पक्षांमधून नशीब आजमावले. मात्र ते यात अयशस्वी ठरले. मात्र पुढे असा पक्षांतर होऊ नये, म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भर सभेत विद्यमान खासदार संजय जाधव यांना पक्षांतर न करण्याची शपथ द्यावी लागली. त्यांनी ही शपथ घेत शिवसेनेचा भगवा जिल्ह्यात कायम राखला आणि यंदाही आपणच एकमेव उमेदवार असल्याचे सिद्ध करून दाखवले.
परभणी लोकसभा मतदार संघात जालन्याचे 2 आणि परभणीचे 4 असे एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. यातील जिंतूर, घनसावंगी, गंगाखेड हे 3 राष्ट्रवादीकडे आहेत तर
1 शिवसेना 1 भाजप आणि 1 अपक्ष असे आमदार असल्याने यंदा मागच्या वेळेपेक्षा परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेत अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर आहे. खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यात विस्तवही जात नाही. तसेच पाथरीचे आमदार मोहन फड हे पण खासदारांचे कट्टर विरोधक आहेत. अशा परिस्थितीत खासदारांनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका लावून जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यातच यावेळी युती झाल्याने त्याचाही त्यांना फायदाच होणार. मात्र पालकमंत्री आणि भाजप नेत्यांमध्ये जिल्हा नियोजन समीतीच्या सदस्यांवरुन असो किंवा छोट्या मोठ्या मुद्द्यांवरुन अनेक वेळा खडके उडाल्याने मागच्या साडेचार वर्षा ज्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसोबत कटाक्षाने मतभेद होते ते हे मतभेद विसरून ते शिवसेनेचे काम करणार का? हा पण मोठा प्रश्न आहे.
परभणी लोकसभा सुरुवातीपासूनच जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. परंतु राष्ट्रवादीला आतापर्यंत याठिकाणी यश आलेलं नाही. मात्र मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांनी मोठे मताधिक्य घेतले होते, तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यंदाही राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पक्षाच्या नेत्यांची आहे. मात्र विजय भांबळे हे उत्सुक नसल्याने त्यांनी आपला नकार पक्षाला कळवला आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांनी केल्याने ते मतदार संघात फिरत आहेत. यांच्या शिवाय माजी खासदार गणेश दुधगावकरही पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. त्यांच्या पाठोपाठ अॅड. बाळासाहेब जामकर, माजी खासदार सुरेश जाधव हे इच्छुक असून पक्षाकडे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणारे नेते जास्त असले तरीही विजय भांबळे यांनीच निवडणूक लढवावी, असा सूर असल्याने अद्याप राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचीही भूमिका महत्वाची राहणार आहे. सध्याचे काँग्रेसमधील नेत्यांचा पूर्वइतिहास पाहता ते आघाडी असली तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून इमाने इतबारे काम करुन घ्यावे लागणार आहे.
शिवसेना,भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी अशी स्पष्ट दुरंगी लढत असताना यंदा काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी दोन वर्षांपूर्वी कन्या मेघना साकोरे यांच्यासह भाजप प्रवेश केला होता. तेंव्हापासून मेघना यांनी त्यांच्या दीपस्तंभ प्रतिष्ठानच्यामार्फत परभणी लोकसभा मतदार संघात काम सुरु केले होते. ते आजही सुरुच आहे. भाजप सेनेची युती जरी झाली तरीही मेघना या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी 1300 पैकी 1100 गावांमध्ये जाऊन प्रचार केला आहे. वडील रामप्रसाद बोर्डीकरांमुळे पूर्वीच्या काँग्रेसमधील आणि आताचे भाजपमधील कार्यकर्त्यांच्या फळीमुळे त्या या दोन्ही उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवून तगडं आव्हान देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार देणार, यावरही बरंचसं गणित अवलंबून आहेत.
काळी कसदार जमीन, गोदावरी, दुधना, करपरा, पुर्णासारख्या चार नद्या, रेल्वेचं मोठं जाळ, असं असताना जिल्ह्यात आजपर्यंत साधा एक कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहू शकला नाही. शेतकरी आत्महत्या, शिक्षण व्यवस्थेची बोंब, वाढेलेली बेरोजगारी, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य समस्यां, असे अनेक प्रश्न असताना विकास कामावर निवडणूक होणं महत्वाचं होतं. मात्र असं न होता धार्मिक, भावनिक मुद्द्यांना हात घालून निवडणूक लढवली गेलीय ज्याचा फायदा आपसूकच शिवसेनेला झाला. मात्र यंदाच्या निवडणुकीत हेच मुद्दे राहणार का? की विकास कामांवर निवडणूक होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातच पूर्ण मतदार संघात मराठा समाजाचे मतदान सर्वाधिक असले तरीही खालोखाल मुस्लिम, दलित, ओबीसी आणि इतर असे मतदानही निर्णायक असल्याने हे मतदार यंदा पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष नेमकं कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
परभणी लोकसभा मतदार संघ
6 विधानसभा मतदार संघ
परभणी,पाथरी,जिंतूर,गंगाखेड
परतूर, घनसावंगी
जालना,परभणी मिळून 1300 गांव
एकूण मतदान केंद्र- 2168
परभणी लोकसभा मतदार संघातील एकूण मतदार- 19 लाख 46 हजार 785
विधानसभा मतदार संघातील आमदार
* परभणी- डॉ राहुल पाटील, शिवसेना
* पाथरी- मोहन फड, अपक्ष
* जिंतुर-सेलु- विजय भांबळे, राष्ट्रवादी
*गंगाखेड- डॉ मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी
*परतूर- बबनराव लोणीकर, भाजप
*घनसावंगी- राजेश टोपे, राष्टवादी
2014 लोकसभेतील मतदान
संजय जाधव शिवसेना- पाच लाख 78 हजार 455
विजय भांबळे राष्ट्रवादी- चार लाख 51 हजार 300
*संजय जाधव यांचा एक लाख 27 हजार 155 मतांनी विजय
मेघना बोर्डीकर
राजेश विटेकर
संजय जाधव
विजय भांबळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement