अंगाला विजयाचा गुलाल, पुढे वडिलांचा फोटो, आईला मिठी मारताच ओम राजेनिंबाळकर भावुक!
Lok Sabha Election Result 2024 : उस्मानाबादच्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. येथे ओम राजेनिंबाळकर यांचा विजय झाला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला आहे. भाजपचा (BJP) अनेक जागांवर पराभव झाला आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघ चर्चेत होते. यातही उस्मानाबादमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar ) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, या विजयानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मोठा जल्लोष केला. याच जल्लोषादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
राजेनिंबाळकर झाले भावुक
ओम राजेनिंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना तब्बल 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभूत केलं. ओम राजेनिंबाळकर यांना तब्बल 7 लाख 48 हजार 752 मते पडली. दुसरीकडे अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते मिळाली. या दमदार विजयानंतर ओम राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांनी संपूर्ण उस्मानाबाद मतदारसंघात जल्लोष केला. ओम राजेनिंबाळकर हेदेखील आनंदात लोकांचे आभार मानत होते.
राजेनिंबाळकर यांना आनंदाश्रू आवरले नाही
विजयानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी आपल्या आईची भेट घेतली. विजयाच्या आनंदात राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या आईची गळाभेट घेतली. आईला मिठी मारताच ओम राजेनिंबाळकर यांना रडू कोसळले. त्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. याच प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.
ओम राजेनिंबाळकर यांचा दणदणीत विजय
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उस्मानबादची जागा चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा निश्चिय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. प्रत्यक्ष मात्र राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना ओम राजेनिंबाळकर यांच्या तुलनेत फार कमी मतं मिळाली. अर्चना पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर यांनीदेखील पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. त्याची प्रचिती मतमोजणीदरम्यान आली. राजेनिंबाळकर यांचा उस्मानाबादमध्ये दणदणीत विजय झाला.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
---------------------
एकूण- 17
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
-----------------
एकूण- 30
हेही वाचा :
तुतारी, पिपाणीचा घोळ! साताऱ्यात संजय गाडेंच्या चिन्हामुळे शिंदेंचा पराभव? वाचा नेमकं काय घडलं?