एक्स्प्लोर
निवडणुकीत हार-जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल? : राज ठाकरे
राज्यातील पुरस्थितीमुळे 21 तारखेला होणारा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं. 28,29 ऑगस्ट दरम्यान हा मोर्चा होणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई : 'सध्या देशात अभूतपूर्व बेरोजगारी असून गेल्या पाच वर्षात देशात 6 लाख कंपन्या बंद झाल्या आहेत. तर दुसरीकडे मोदी काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन देत आहेत', अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील बेरोजगारीवरुन सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पुरस्थितीमुळे 21 तारखेला होणारा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं. 28,29 ऑगस्ट दरम्यान हा मोर्चा होणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी आज पहिल्यांदा मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर त्यांनी सवाल केला आहे. भाजप विरोधात राज्यातील सर्व पक्ष एकत्रित आले तरी आम्हीच जिंकणार, असे भाजपचा एक पदाधिकारी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांना बोलल्याची माहिती राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली. 'लोकसभा निकालानंतर आपण 23 मे ला 'अनाकलनीय' अशी एकच प्रतिक्रिया व्यक्त केली होती, हे कसं झालं हे कळत नाही. निवडणुकीत हार जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल, सगळे फिक्स असेल तर एवढी मेहनत करायची कशाला?', अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- काश्मीरच्या कलम 370 बद्दल सगळे बोलत आहेत मात्र देशातील 371 लोकसभा मतदारसंघात मतदानात घोळ झाला त्याबद्दल कोणी बोलत नाही
- निवडणुकीत हार जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल, सगळे फिक्स असेल तर एवढी मेहनत करायची कशाला
- माहितीच्या अधिकारात करण्यात आलेले बदल धोकादायक, माहिती द्यायची की नाही हे आता सरकार ठरवणार
- माहिती अधिकाराच्या नाड्या मोदी-शाहांच्या हातात, माहिती अधिकार सरकारचे बाहुले होणार, इतका कमकुवत माहिती अधिकार हवाच कशाला?
- वाहन निर्मिती क्षेत्रात सध्या अभूतपूर्व मंदी, भारतात सध्या गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी
- कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करु, पण ज्या राज्यात 370 नाही त्या राज्यात बेरोजगारी का वाढतेय?
- कधीकाळी भक्त असलेल्यांचा आज भ्रमनिरास झालाय, मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंचा घणाघात
- ईडीच्या नोटिशीमुळे काही फरक पडणार नाही
- भाजपकडून निवडणुकीआधी वातावरण तयार केलं जातं, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते बोलले होते 350 जागा येणार आल्या 303, आता मुख्यमंत्री म्हणतात आमच्या 250 जागा येणार मग आम्ही काय 28 जागांवर गोट्या खेळायच्या का?
- लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला, याचा अर्थ काय समजायचा?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी देखील मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवं अशी घोषणा केली, अमेरिकेत ईव्हीएमची चिप बनते पण या देशांचा ईव्हीएमवर विश्वास नाही मग आपण का हट्ट धरतोय?
- महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले
- अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ, शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गीते हे शिवसेना नेते पडले आणि काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला.
- बॅलेट पेपेरवर निवडणुका झाल्या आणि हे निवडून आले तर मी स्वतः पुष्पगुच्छ देईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement