एक्स्प्लोर
महायुतीला दणका, दिग्गजांसह सात विद्यमान मंत्र्यांचा पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये सर्वात मोठा फटका भाजप-शिवसेना महायुतीला बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महायुतीमधील पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये सर्वात मोठा फटका भाजप-शिवसेना महायुतीला बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महायुतीमधील सात विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये परळीतून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, बीडमधून मंत्री जयदत्त क्षीरसागर, कर्जत जामखेडमधून राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषिमंत्री अनिल बोंडे, दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर आणि मदत पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे या मंत्र्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या सातपैकी सहा नवनियुक्त आमदार हे पहिल्यांदा विधानसभेत जाणार आहेत. सोबतच भाजप शिवसेनेतील 19 आयारामांचा देखील दारुण पराभव झाला आहे. यामध्ये 11 भाजपच्या तर आठ शिवसेनेच्या आयारामांचा पराभव झाला आहे.
परळीत पंकजा मुंडेंचा पराभव
बीड जिल्ह्यातील परळीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मोठ्या प्रमाणावर भावनिक झालेल्या परळीच्या रणांगणात अखेर भावाने बहिणीचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. दरम्यान मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. हा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.
कृषी मंत्री अनिल बोंडेंची हार
कृषी मंत्री अनिल बोंडे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्याने त्यांना धूळ चारली आहे. अमरावतीमधील मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांचा पराभव केला.
क्षीरसागर काकांचाही पराभव
राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघाकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या लढतीत काका जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची वर्णी मंत्रीपदी लागली होती.
कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांची हवा
कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे युवा उमेदवार रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत झेंडा रोवला आहे. बाहेरचे 'पार्सल' पाठवून देऊ असं म्हणणाऱ्या राम शिंदे यांनाच जनतेने घरी पाठवले आहे.
पुरंदरमध्ये शिवतारेंना धक्का
पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला आहे. प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवतारे यांना 'निवडून कसा येतो, तेच बघतो' असे म्हणत आव्हान दिले होते. पवारांचे हे आव्हान प्रत्यक्षात उतरले आहे.
जालन्यात खोतकरांना पराभवाचा झटका
जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल हे विजयी झाले आहेत. खोतकर यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी घेतलेला पंगा महागात पडल्याची चर्चा आहे.
संजय भेगडेंचा पराभव
शेवटच्या टप्प्यात मंत्री झालेले भाजपचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी भेगडे यांना मात दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
राजकारण
Advertisement