निकालानंतर विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त, नाराजांना खूश करण्याची महायुतीला पुन्हा संधी; नेमकी कुणाला संधी मिळणार?
राज्यात नुकत्याच पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले आहे. या विजयानंतर महायुतीच्या वाट्याच्या एकूण सहा जागा रिक्त होणार आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024 Result) निकालात महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणूकत भाजपाने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना तिकीट दिले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या 6 नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
भाजपाच्या एकूण चार जागा रिक्त
मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते, त्यांना आता विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील भाजपच्या ४ आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. सध्या विधानपरिषदेवर आमदार असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे भाजपाचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत.
शिंदे, अजित पवार यांच्या प्रत्येकी एक-एक जागा रिक्त
दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचीही एक जागा विधानपरिषदेत रिक्त होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्याला संतुष्ट करण्याची संधी एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हेदेखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. मात्र ते विधानसभा निवडणुकतीही विजयी झाले आहेत. परिणामी विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनादेखील त्यांच्या एका नेत्याची नाराजी दूर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
हेही वाचा :