Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी; कोणाचं किती संख्याबळ? A टू Z माहिती एका क्लिकवर
Maharashtra MLA Party Wise List: 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Maharashtra MLA Party Wise List: गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. याचदरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचा (Maharashtra Vidhansabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election 2019) भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल-
महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019, पक्षीय बलाबल- (Maharashtra Assembly Election result 2019 Party wise result)
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288
सध्या राजकीय चित्र काय?
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदारांचं संख्याबळ-
भाजप- 103
शिवसेना शिंदे गट- 40
शिवसेना उद्धव ठाकरे गट- 15
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 43
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 10
काँग्रेस- 43
अन्य- 34
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी-
दरम्यान, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी मविआतून बाहेर पडून, शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महायुतीमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर 2023 मध्ये अजित पवारही महायुतीमध्ये सहभागी झाले.