वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातूनच बाळासाहेब थोरातांना धक्का, महायुतीच्या अमोल खताळांना भरघोस मतदान
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुखांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक थोरात विरुद्ध विखे अशीच गाजली. मात्र प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्या विषयी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत बेताल वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांच्या वक्तव्याने देखील निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातच महायुतीला मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे.
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या मांडला होता. यामुळे विखे-थोरात कुटुंबियातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले होते.
धांदरफळ गावातून महायुतीला मताधिक्य
संगमनेरमध्ये झालेल्या या राड्यामुळे महायुतीला फटका बसेल, असे बोलले जात होते. मात्र, संगमनेर विधानसभेत यंदा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या मतदारसंघातून तब्बल आठ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. तर ज्या गावात वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलं होतं. त्याच धांदरफळ गावात मात्र मतदारांनी महायुतीला मताधिक्य दिल्याचं समोर आलं आहे. धांदरफळ बुद्रुक व धांदरफळ खुर्द या दोन्ही गावातून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांना 1098 मतांचे मताधिक्य मिळालं आहे.
मिळालेली मते.. (धांदरफळ बुद्रुक व धांदरफळ खुर्द )
बाळासाहेब थोरात - 1847
अमोल खताळ - 2945
विजयानंतर अमोल खताळांची प्रतिक्रिया
अमोल खताळ म्हणाले की, माझा विजय हा संगमनेर मतदारसंघातील लाडक्या बहिणी, युवक आणि ज्येष्ठ वर्गाला मी समर्पित करतो. संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने ही निवडणूक हातात घेतली. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली. गेला दीड वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे. त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला या मतदारसंघातील दहशत थांबवायची होती. या विजयानंतर दहशत थांबवण्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालोत. येणाऱ्या काळात विकासाचे राजकारण या मतदारसंघात केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा