Sanjay Raut : मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जास्त मतभेद नाहीये. काँग्रेसचे राज्यातील नेते तिढा असलेल्या जागावर मार्ग काढण्यास सक्षम दिसत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा असून काँग्रेसने (Congress) यादी हायकमांडकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, माझी आत्ताच मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथला, वेणूगोपाल यांच्याशी चर्चा झाली. मी राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आज बोलणार आहेत. तिढा असलेल्या जागांवर लवकर मार्ग काढावा, असे आम्ही म्हणतोय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जास्त मतभेद नाहीये. काँग्रेसचे राज्यातील नेते तिढा असलेल्या जागावर मार्ग काढण्यास सक्षम दिसत नाहीये. ते म्हणताय हायकमांडशी चर्चा करावी लागेल. पण आता वेळ फार नाही, वेगाने चर्चा व्हावी. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितला आहे की, लवकर निर्णय घ्यावा आणि जागा वाटप जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले.
भाजपची बिष्णोई गँग आम्हाला त्रास देतेय
मी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सुद्धा काही सूचना मला केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जागा वाटप पूर्ण करू. कोणाची काय बैठकीत भूमिका आहे हे मी उद्धव ठाकरेना सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्हाला करायचा आहे. भारतीय जनता पक्षाशी कसा लढायचं हे आम्हाला माहिती आहे. भाजपने सर्वात जास्त शिवसेनेला त्रास दिला आहे. भाजपची बिष्णोई गँग आम्हाला त्रास देत आहे. हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत, अशी संजय राऊत म्हणाले.
आम्ही विधानसभेला अपेक्षा ठेवल्या तर चुकीचं काय?
काँग्रेसचे काही नेते विदर्भातील काही जागांवर अडून आहेत. त्यामुळे जागा वाटपाला उशीर होत आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काय स्वतंत्र नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही जिंकले आहेत. शिवसेनेचे खासदार जिंकले आहेत. रामटेकसारखी सहा वेळेला निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. अमरावतीची आमची हक्काची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्या बदल्यात आम्ही विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे असे काही मला वाटत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक आयोग भाजपची बी टीम
महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे निर्णय जाहीर केले आहे. ते फक्त भाजप आणि शिंदे गटाला मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायलय ही भाजपची बी टीम आहे.त्यामुळे निवडणूक आयोग काही करणार नसेल तर जनतेसमोर आम्हालाही विषय आणावे लागतील.
सांगोल्याची जागा शिवसेनेची
आज सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांचा प्रवेश आहे. राजन तेली यांचा प्रवेश आहे. भविष्यात अजून काही महत्त्वाचे प्रवेश महाराष्ट्रातून होतील. सांगोल्याच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा आहे, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, सांगोल्याच्या जागेवर दावा कसा असेल? सांगोल्याची जागा ही शिवसेनेचे आहे. तिथे आमचे विद्यमान आमदार तिथे आहेत आणि जिंकलेली ती जागा आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा