Nana Kate: अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
Nana Kate: अजित पवारांनी भेट घेतल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना नाना काटे म्हणाले, आमची फार काही चर्चा झाली नाही. दिवाळीनिमित्त आम्ही भेटलो.
पुणे: चिंचवड विधानसभेतील नाना काटे यांची बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः अजित पवार यांच्या घरी पोहचले. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली, मात्र त्यानंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम आहेत. भाजपचे उमेदवार शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्या विरोधात नाना काटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अजित पवारांनी भेट घेतल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना नाना काटे म्हणाले, आमची फार काही चर्चा झाली नाही. दिवाळीनिमित्त आम्ही भेटलो. दादांनी मला फोन केला आणि मी बारामतीला जाणार आहे, भेटून जातो म्हणाले त्यानुसार ते घरी भेटण्यासाठी आले होते.
ते आले तेव्हा राजकीय गोष्टीवर चर्चा झाली. निवडणुकीत काय परिस्थिती असेल याबाबत चर्चा झाली. अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर ठाम आहोत. महायुतीचा उमेदवार चिंचवड मधला आहे. त्यामुळे ते कदाचित आले असतील. दादांच्या पक्षांचा मी आहे, त्यामुळे ते आले असतील, मात्र, उमेदवारी मागे घेण्याबाबत आमच्यात चर्चा झाली नाही. त्यांनी मतदारसंघातील सर्व माहिती जाणून घेतल्याची माहिती यावेळी नाना काटेंनी दिली आहे.
नाना काटे अपक्ष लढणार
महायुतीकडून चिंचवडची जागा भाजपला सुटली आहे, भाजपने शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेले नाना काटे यांना शेवटी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नव्हती. उमेदवारी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.