रायगडमध्ये अनेक जागांवर बंडखोरांमुळे डोकेदुखी, महायुती, मविआ कसा मार्ग काढणार; संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार!
विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्याची सगळीकडे चर्चा आहे. या जिल्ह्यातील अनेक जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी झालेली आहे.
रायगड : जिल्हयातील सात विधानसभा मतदारसंघातून 111 उमेदवारांनी 140 उमेदवारी अर्ज भरले होते. बुधवारी झालेल्या छाननीत 22 अर्ज अवैध तर 118 अर्ज वैध ठरले होते. आज 3 वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी 3 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे पनवेल, अलिबाग, कर्जत, पेण, उरण, श्रीवर्धन, महाड मतदारसंघातून कोणकोणते उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
कोणकोणत्या मतदारसंघांत बंडखोरी?
कर्जत खालापूर मतदारसंघ - या मतदारसंघात मुख्य लढत ही मविआचे नितिन सावंत विरूद्ध (शिंदे गट) महेंद्र थोरवे यांच्यात होणार आहे. मात्र युतीतून बाहेर पडून बंडखोरी केलेले सुधाकर घारे आणि भाजपचे किरण ठाकरे रणांगणात उतरले आहेत.
पेण सुधागड मतदारसंघ - या मतदारसंघात मुख्य लढत भाजपचे रवींद्र पाटिल विरूद्ध मविआचे (शेकाप ) अतुल म्हात्रे यांच्यात होणार आहे. मात्र भाजपचे प्रसाद भोईर यांनी भाजपमधून बाहेर पडत अपक्ष लढवण्याची भूमिका घेतली. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रसाद भोईर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे येथ मविआचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
अलिबाग मतदारसंघ - येथे मुख्य लढत शिंदे गटाचे महेंद्र दळवी विरूद्ध शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्यात होणार आहे. मात्र या मतदारसंघातही मविआकडून ठाकरेंच्या सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंची शिवसेना ही जागा लढवण्यास इच्छुक आहे. तर भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईरसुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम असून माघार घेण्यास तयार नाहीत.
उरण मतदारसंघ - येथे मुख्य लढत ही भाजपचे महेश बालदी विरूद्ध मविआचे मनोहर भोईर यांच्यात होईल. मात्र येथे शेकापनेही अगोदरच प्रितम म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करून ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या जागेवर मविआचे दोन-दोन उमेदवार रणांगणात उतरल्याच चित्र आहे. त्यामुळे मविआ या दोन्ही जागा लढणार की आज कोणालातरी माघार घ्यायला लावणार हे आज स्पष्ट होईल.
श्रीवर्धन मतदारसंघ - श्रीवर्धन मतदारसंघात युतीच्या आदिती तटकरे विरूद्ध मविआचे अनिल नवगने यांच्यात आणि बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र मविआचे घटक असलेल्या काँग्रेसचे बंडखोर राजा ठाकूर यांनीसुद्धा या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे राजा ठाकूर लढणार की माघार घेउन मविआला मदत करणार हे आज स्पष्ट होईल.
हेही वाचा :