मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, 'या' महत्त्वाच्या मतदरसंघात उमेदवार देणार; अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढणार!
मनोज जरांगे यांनी यावेळची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी कोणकणत्या मतदारसंघांत निवडणूक लढवणार, याची माहिती दिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) सध्या राज्यात धूम आहे. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सध्या राजधानी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील बंडखोरांना कसे शांत करायचे, यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खल चालू आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून नराज नेत्यांची मनधरणी करणे चालू आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली असून काही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मतदारसंघांची नावंदेखील दिली आहेत.
काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती भूमिका
मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी जिथे आपली ताकद आहे तसेच अन्य पक्षांचे, गटांचे समर्थन मिळणे ज्या भागात शक्य आहे तेथे निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. एससी, एसटी या आरक्षित जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. सोबतच ज्या जागांवर आपली ताकद नाही, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचं, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आज निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघांची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे हे मराठवाड्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठवाड्यातील मतदारसंघ निवडले आहेत. यामध्ये बीड, परतूर, फुलंब्री, पाथरी यासारख्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार?
1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,( परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)
कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)
----------------------
कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?
1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
दरम्यान, जरांगे यांनी काही जागा लढवण्याचे ठरवले आहे. तर काही जागांवर उमेदवारांना पाडण्याची भाषा बोलून दाखवलेली आहे. कोणत्या मतदारसंघात पाडापडाची मोहीम राबवायची याची यादीच जरांगे यांनी दिली आहे. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Ajit Pawar : 'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?