Prasad Lad On Amit Thackeray: ठरलं!आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार; भाजपने स्पष्ट केली भूमिका, सदा सरवणकरांना अल्टिमेटम?
Prasad Lad On Amit Thackeray: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे.
Prasad Lad On Amit Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे.
अमित ठाकरे (Amit Thackeray) रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे.
प्रसाद लाड काय म्हणाले?
अमित ठाकरे आमचा मुलगा आहे. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार...अमित ठाकरेंना आम्ही निवडून आणणार, असं प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच सदा सरवणकर ज्येष्ठ नेते आहेत. ते सध्या सिद्धिविनायक मंदीराचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील दिला आहे. एकनाथ शिंदे त्यांना विधानपरिषदेवर संधी देतील. त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज माघार घेतील, असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समजवतील. पण आम्ही मनसेला मदत करु...मनसेने आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे उद्या आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघू, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला जोर आणखी वाढताना दिसेल.
सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, काय म्हणाले?
सदा सरवणकर यांना वारंवार निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला जातोय. मात्र निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही, असं सदा सरवणकर यांनी सांगितले. तसेच एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.