Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामध्ये 62 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 46 जागा काँग्रेसकडे आठ जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि आठ जागा शिवसेना ठाकरे गटाला असं वाटप झालं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भातील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा कायम आहे. विदर्भामध्ये आठ जागा मिळत असल्याने कमालीचा नाराज झालेल्या ठाकरे गटाने कोणत्याही परिस्थितीत 12 जागा मिळण्यासाठी आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीत वाटप झालेल्या जागांपेक्षा ठाकरे गटाला विदर्भामध्ये चार जागा अधिकच्या हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. विदर्भामध्ये 62 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 46 जागा काँग्रेसकडे आठ जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि आठ जागा शिवसेना ठाकरे गटाला असं वाटप झालं आहे.
कोणत्या जागांवर ठाकरे गटाचा दावा?
मात्र विदर्भामध्ये 12 जागांवर ठाकरे आग्रही आहे. विदर्भातील रामटेक, कामठी, दक्षिण नागपुर, वरोरा, आरमोरी , भंडारा, बुलढाणा, सिंदखेडराजा, आरणी, वर्धा, यवतमाळ, दिग्रज या जागांसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, विदर्भात काँग्रेसची ताकद जास्त असल्याने या जागा काँग्रेसला सोडाव्यात इतर ठिकाणी आम्ही कमी घ्यायला तयार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र, विदर्भामध्ये 12 जागांपेक्षा आम्ही कमी जागा घेणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाला होता.
दरम्यान, या वादानंतर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनी मातोश्रीर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणत्याही वाद नसल्याचे म्हटलं आहे. एक ते दोन दिवसांत जागांवरती चर्चा करून जागावाटप जाहीर केले जाईल, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यांची प्रकृती ठीक नाही. मला एवढेच सांगायचे आहे की उद्धव ठाकरेही निरोगी आहेत आणि महाविकास आघाडीही निरोगी आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. जागावाटपाबाबत आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. संजय राऊत म्हणाले की, रमेश चेन्नीथला मातोश्रीवर आले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही चर्चा केली. दोन दिवसांपासून रखडलेली चर्चा आज दुपारी पुन्हा सुरू होणार आहे. रात्री उशिरापर्यंत चर्चा पूर्ण करून जागावाटप निश्चित केले जाईल, असे आम्ही ठरवले आहे. समाजवादी पक्ष आमच्यासोबत असून शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा झाली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
