(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election : एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी थांबवलं. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपासाठी मुंबई ते दिल्ली बैठकांवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर चंदीगडमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली. मात्र या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंदीगडमध्ये जागा वाटप संदर्भात बैठक झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, पहिल्यांदा चंदीगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रूममधून बाहेर पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी थांबवलं. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही 15 ते 20 मिनिटांची चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मात्र हॉटेल बाहेर थांबावं लागलं. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व खुश असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिमेचा वापर जास्तीत जास्त करावा अशी केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे समोर आलं आहे.
अमित शाहांचं अजित पवारांना आश्वासन
दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीत अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अडीच तास चर्चा झाली. तीनही नेत्यांनी जागावाटपाचा तिढा सोडवला असल्याची माहिती आहे. आता केवळ काही जागांचाच प्रश्न बाकी आहे. अमित शाहांसोबत पार पडलेल्या बैठकीत जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरलेल्या अजित पवारांनी आपल्या आग्रह सोडावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. अन्य राजकीय पुनर्वसनात जास्तीचा लाभ देण्याचं अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या