Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पण तुटेपर्यंत आणू नका! विदर्भात किती जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये घमासान सुरु? इशारा देत भास्कर जाधवांनी आकडा सांगितला
कधी शरद पवार, कधी संजय राऊत, तर कधी काँग्रेसचे नाना पटोले यांच्याकडून जागावाटप लवकरच होईल, अशी विधाने येतात, पण अद्यापही तिढा सुटलेला नाही हे भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपने 99 जणांची यादी जाहीर करूनही महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भामधील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात घमासान सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील गुंता वाढत चालला आहे. महाविकास आघाडीकडून उद्या (21 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केलं असलं, तरी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून अजूनही वाद असल्याचे चित्र आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी विदर्भातील 14 जागांवर आमचा हक्क असल्याचे म्हटले आहे. तथापि, त्या जागा द्यायला काँग्रेस तयार नाही त्यामुळे हे सगळं अडलं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी तुटावी अशी आमची अजिबात इच्छा नाही, पण तुटेपर्यंत आणू नका, असा इशारा सुद्धा भास्कर जाधव यांनी दिला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमधील मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.
विदर्भातील जागांवरून तिढा अजूनही कायम?
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये 260 जागांवर एकमत झाली असून 28 जागांवरच चर्चा अडकल्याची माहिती होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिल्याने या आघाडीत काँग्रेसला 100 हून अधिक जागा देण्याचीही चर्चा होती. मात्र, 12 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या 12 जागांवर चर्चेची गाडी अडकली आहे त्यापैकी 6 जागा 2019 मध्ये भाजपने जिंकल्या होत्या, तर चार अपक्ष विजयी झाले. अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर तर काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला होता. कधी शरद पवार, कधी संजय राऊत, तर कधी काँग्रेसचे नाना पटोले यांच्याकडून जागावाटप लवकरच होईल, अशी विधाने येतात, पण अद्यापही तिढा सुटलेला नाही हे भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे. निवडणुकीला आता केवळ एक महिना उरला आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
जागा वाटप होताच यादी जाहीर केली जाईल
घटक पक्ष देखील लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करू शकतात. समाजवादी पक्षानेही महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यांना तीन जागा मिळू शकतात, तर 12 जागा मागितल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या