विदर्भातील जागावाटपाचा तिढा कायम? काँग्रेसचे माजी मंत्री मातोश्रीवर दाखल, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तोडगा निघणार का?
महाविकास आघाडीत विदर्भातील जागांचा तिढा सुटला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विदर्भातील काही जागांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सुनिल केदार (Sunil Keadr) हे मातोश्रीवर (Matoshree) दाखल झालेत.
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीने काल पत्रकार परिषद घेत जागावटापाचा तिढा सुटल्याचे जाहीर केले होते. 85 85 85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून, 270 जागांवर एकमत झाल्याची भूमिका घेतली होती. मात्र, सध्या सुरु असलेल्या घडामोडींवरुन महाविकास आघाडीत विदर्भातील जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, विदर्भातील काही जागांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सुनिल केदार (Sunil Keadr) हे मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत.
विदर्भातील जागांच्या संदर्भात सुनिल केदार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार
विदर्भातील काही जागांसंदर्भात अद्यापही महाविकास आघाडीत तिढा कायम आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार हे मातोश्रीवर आले आहे. ते विदर्भातील जागांच्या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आज तरी सुटतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या चर्चेत आता स्पीड ब्रेकर राहिले नाही. फक्त एक दिवस वातावतरण तापले होते, मात्र आता सर्व योग्य दिशेने सुरू आहे. किंबहुना शिवसेनेचा गड कोकण, मुंबई आहे. तसेच विदर्भ हा काँग्रेसचा (Congress) गड आहे. आपल्या बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त जागा घेण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. सरतेशेवटी शिवसेनेसोबत सामंजस्य होईल आणि विदर्भात काँग्रेस आपल्या जागा ठेवण्यात यशस्वी होईल, असे मत काँग्रेसच्या काही नेत्यांनी व्यक्त केले होते.