भाजपचे सोलापूर दक्षिणचे उमेदवार सुभाष देशमुखांची संपत्ती किती? 5 वर्षात कर्ज आणि गुन्ह्यात वाढ
भाजपकडून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Solapur South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती? याबाबतची माहिती.
Subhash Deshmukh : भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून (Solapur South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास आठ गुन्ह्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांच्या कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या जंगम मालमत्तेमध्ये घट झालीय. स्थावर मालमत्तेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सुभाष देशमुखांकडे जंगम मालमत्ता 18 कोटी 20 लाख 51 हजार 485 रुपये
सुभाष देशमुख यांनी दाखल केलेल्या शपथपत्र नुसार 2019 मध्ये त्यांच्यावर 4 गुन्ह्यांची नोंद होती. 2024 मध्ये मात्र गुन्ह्यांची संख्या 12 झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे हे कोरोना काळात केलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे दाखल करण्यात आले आहेत. सुभाष देशमुखांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही. मात्र कुटुंबियांचे नावाने तीन ट्रॅकटर आहेत. सुभाष देशमुख यांचे शिक्षण 1971 साली 11 वी पर्यंत झाले आहे. सुभाष देशमुख यांच्या जंगम मालमत्तेमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 1 कोटी 88 लाखांची घट झाली आहे. 2019 मध्ये सुभाष देशमुख यांच्या कुटुंबाकडे एकूण 20 कोटी 8 लाख 53 हजार 589 रुपयांची मालमत्ता होती. 2024 मध्ये मात्र जंगम मालमत्ता ही 18 कोटी 20 लाख 51 हजार 485 रुपयावर पोहोचली आहे.
स्थावर मालमत्ते मोठ्या प्रमाणात वाढ
सुभाष देशमुख यांच्या स्थावर मालमत्ते मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत सुभाष देशमुखांच्या स्थावर संपत्तीमध्ये सुमारे 16 कोटी 17 लाख 7 हजार रुपयांची संपत्ती वाढल्याचे दिसून येतं आहे. 2019 मध्ये सुभाष देशमुखच्या संपूर्ण कुटुंबाकडे सुमारे 28 कोटी 38 लाख 14 हजारांची स्थावर मालमत्ता होती. 2024 मध्ये ही संपत्ती 44 कोटी 55 लाख 21 हजार रुपयावर पोहोचली आहे. स्थावर मालमत्तेमध्ये सुमारे 5 कोटी 3 लाखांची संपत्ती ही वडीलपोर्जित आहे.
सुभाष देशमुख यांच्यावरील कर्जामध्ये वाढ
सुभाष देशमुख यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असली तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज देखील आहे. 2019 च्या तुलनेत या कर्जामध्ये वाढ झाल्याचे देखील देशमुख यांनी सादर केलेल्या शपथ पत्रमधून दिसून येतंय. सुभाष देशमुख आणि त्यांच्या कटुंबियांवर 2019 मध्ये 17 कोटी 52 लाख 55 हजार 622 रुपयांचे कर्ज होते. या कर्जमध्ये सुमारे 4 कोटी 15 लाख 73 हजार 400 रुपयांची वाढ झाली असून सध्या देशमुख यांच्या कुटुंबियांवर तब्बल 21 कोटी 68 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती अर्जात दिली आहे.