Khanapur Vidha Sabha : खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख तुतारीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता शरद पवार गटाची उमेदवारी वैभव पाटील यांना भेटल्याने राजेंद्र देशमुख गट काय भूमिका घेणार? याकडे लक्ष आहे.
Khanapur Vidha Sabha : सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. खानापुरात धनुष्यबाण आणि तुतारीमध्ये लढत होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार गटाकडून वैभव पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. वैभव पाटील यांना शरद पवार गटाकडून काल (27 ऑक्टोबर) रात्री उमेदवारी जाहीर झाली.
आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख तुतारीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता शरद पवार गटाची उमेदवारी वैभव पाटील यांना भेटल्याने राजेंद्र देशमुख गट काय भूमिका घेणार? याकडे लक्ष आहे. दरम्यान वैभव पाटील आज खानापूर मतदारसंघतून अर्ज भरला आहे.
सांगली जिल्ह्यात बंडखोरीचे ग्रहण
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. सांगली विधानसभेत काँग्रेसमध्ये, शिराळा आणि जत विधानसभामध्ये भाजपत बंडखोरी झाली आहे. सांगलीमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज होत बंडखोरी केली आहे. शिराळामध्ये भाजपमधून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी भेटल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध
जतमध्ये भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी भेटल्याने तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरी शेवटपर्यंत राहतात का आणि जरी बंडखोरी कायम राहिली तर ती कुणाला अडचणीची ठरणार हे पाहावे लागणार आहे. जतमधील भाजप इच्छुकांनी पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत भूमिपुत्र उमेदवार देण्याची मागणी केली होती. तथापि, पडळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांच्या हाती घड्याळ
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना बांधले आहे. अजित पवार यांनी जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन जयंत पाटील यांना आव्हान दिलं आहे. शिंदे गटाकडून आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, निशिकांत पाटील यांनी महायुतीची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या