Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Crisis: अजित पवार पक्षाचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे, अनेक जण शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज भरत आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील आज आंबेगाव विधानसभेसाठी आठव्यांदा अर्ज भरत आहेत. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपूर्वी महायुतीतील शिंदे सेनेत फूट पडल्याचं चित्र दिसून आलं आहे. वळसेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतच राडा झाल्याची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी दिलीप वळसेंना विरोध दर्शविला. मला पक्षाची बैठक असल्याचं सांगून बोलवलं, प्रत्यक्षात इथं दुसराच ठराव घेतला जात आहे. मुळातच मला हे मान्य नाही. वळसेंनी वेळोवेळी त्रास दिला, माझं जगणं त्यांच्यामुळं कठीण झालं आहे. त्यामुळं मी आणि माझे समर्थक वळसेंचा प्रचार करणार नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता पक्षातून बाहेर पडत आहोत, असं जाहीर करत आडारी यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यानंतर राष्ट्रीय युवा सरचिटणीस सचिन बांगर आणि शहराध्यक्ष प्रवीण थोरात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणालेत शिंदेंच्या शिवसेनेच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी?
त्यांचा सभापती निवडून आणताना आणि बाकी सर्व कामात त्यांना मदत केली, मात्र, बाकी आदीवासी भागात त्यांच्याकडून मला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढतोय असे दिवस मी काढत आहे. फक्त मिटिंग आहे, असं सांगून बोलावलं गेलं. मात्र त्यांनी मला याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. मी जिल्ह्याचा आदीवासी प्रमुख म्हणून रकाम करतो आहे. मी आत्ता याक्षणी पक्ष सोडला आहे. मी पुढची भूमिका आत्ताच सांगणार नाही. महायुतीचा उमेदवार म्हणून दिलीप वळसे पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे.