Rajesh Kshirsagar : काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
जयश्री जाधव वहिनी विद्यमान आमदार होत्या. सामान्य कार्यकर्त्याला संधी देणार असाल, तर मी थांबते असं जाधव वहिनी म्हणाल्या होत्या, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.
Rajesh Kshirsagar on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर शिंदे गटाचे कोल्हापुरातील नेते माजी आमदार आणि कोल्हापूर उत्तरच्या रिंगणात असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने केलेल्या अन्यायामुळे हळूहळू एक एक बॉम्ब फुटतील, अशी टीका राजेश क्षीरसागर यांनी केली.
2019 मध्ये शिवसेनेला फोडून तुम्ही आघाडी सरकार बनवलं होतं आणि कोल्हापूरचे पालकमंत्रीपद भूषवलं होतं. ते बरोबर होतं का अशी विचारणा सुद्धा राजेश क्षीरसागर यांनी केली. सतेज पाटील यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की हे का घडलं? हम करे सो कायदा याला काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे, असं म्हणावं लागेल असे ते म्हणाले. काँग्रेसने स्वतःच्याच नेत्यांवर अन्याय केला असून त्या त्यामुळे ते बॉम्ब हळूहळू फुटत असल्याचेही ते म्हणाले.
माझा फराळ अगदी गोड होईल
राजेश क्षीरसागर म्हणाले की, थोडं तिखट, थोडं गोड असा फराळ निवडणुकीपर्यंत सुरू असतो. 23 तारखेनंतर माझा फराळ अगदी गोड होईल, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की आताचे फटाके म्हणजे आपणच तयार केलेले फटाके हळूहळू फुटत असतात. जसे काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते ते फुटत आहेत. जयश्री जाधव वहिनी विद्यमान आमदार होत्या. मात्र, त्यांना कोणत्याच प्रक्रियेमध्ये घेण्यात आलं नाही, त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. सामान्य कार्यकर्त्याला संधी देणार असाल, तर मी थांबते असं जाधव वहिनी म्हणाल्या होत्या, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.
काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत वाद
त्यांनी पुढे सांगितले की खासदार शाहू छत्रपती यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरफायदा घेण्यात आला. शाहू महाराजांच्या सूनबाईंना उमेदवारी दिली. मात्र, या प्रक्रियेत जाधव वहिनींना कुठेही घेतले गेले नसल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याने हे घडलं असल्याचा दावा सुद्धा क्षीरसागर यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या