दादागिरी नहीं चलेगी...; गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा काढता पाय
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबई पोलिसांचा बोरीवली निवडणूक कार्यालयाबाहेर भोंगळ कारभार दिसून आला.
Gopal Shetty मुंबई: बोरिवली मतदारसंघात भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी घोषित केली. यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी उघडपणे नाराजी जाहीर केली. तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही भरला. मात्र बोरिवली विधानसभेत आज संजय उपाध्याय आणि गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळाले.
संजय उपाध्याय आज उमेदवारी अर्ज भरण्यास दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पीयूष गोयल देखील उपस्थित होते. अशात गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दादागिरी नहीं चलेगी, गोपाळ शेट्टी जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. तर महायुतीकडून मोदी, मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
पियूष गोयल यांचा काढता पाय-
पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाही. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनाही काढता पाय घेतला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महायुती संजय उपाध्याय यांच्यासोबत उभी आहे. भाजप ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
बोरीवली निवडणूक कार्यालयाबाहेर भोंगळ कारभार-
मुंबई पोलिसांचा बोरीवली निवडणूक कार्यालयाबाहेर भोंगळ कारभार दिसून आला. गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्यानंतर आता महायुती आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय भोसले यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. पोलिसांकडून भाजप आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पोलिसांची कुमक कमी पडल्याने अडचण निर्माण होत आहे. निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिसांच्या नियोजन शून्य कामाअभावी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गोपाळ शेट्टी काय म्हणाले?
मी उमेदवारी अर्ज भरला आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ही लढाई कोणत्या उमेदवाराशी नाही. माझी नाराजी पक्षाशी नाही. कोणत्याही नेते मंडळीशी नाही. मी बोरिवलीकरांसाठी उभा आहे. संजय उपाध्याय भाजपचे चांगले कार्यकर्ते आहेत, पण ते स्थानिक नाही, त्यामुळे वारंवार बोरिवलीतील मतदारांवर अन्याय केला जातोय, असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. मला उमेदवारी मिळावी ही मागणी मी कधीच केली नाही. या आगोदर जेवढे निर्णय घेण्यात आले ते मला मान्य होते. मला बोरिवलीची जागा कायम राखाची आहे , म्हणून मला लढावं लागेल. मी कार्यकर्ता आहे आणि मी इतकी वर्ष काम करतो आहे. कोणाला डावललं जातं आहे हे मी काही बोलणार नाही. पण पक्षाचे काही निर्णय चुकले आहेत.