(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra MLC Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान, 2 तारखेला लागणार निकाल; जाणून घ्या कुठे झालं किती टक्के मतदान
Maharashtra Graduate And Teacher Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
Maharashtra Graduate And Teacher Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे. याचे निवडणुकीचे निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. यातच कोणत्या विधान परिषदेच्या जागेसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान झालं हे जाणून घेणार आहोत.
Teachers Constituency Election Nagpur : विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; 86.23 टक्के मतदान
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यात दुपारी चारपर्यंत 86.23 टक्के मतदान झाले आहे.
Teachers Constituency Election Konkan: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक, 91.02 टक्के मतदान
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणपणे 91.02 टक्के मतदान झाले. सकाळी 8 वाजल्यापासून नवी मुंबईत सुरु होणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील एकूण 20 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण 15 हजार 300 शिक्षक मतदार होते. यामध्ये 6029 पुरुष व 9271 स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानात एकूण 13 हजार 595 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Aurangabad Teacher Constituency Election : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 86 टक्के मतदान
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी चार वाजेपर्यंत 86 टक्के मतदान झालं आहे. आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे.
Amravati Graduate Constituency Election : अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदानासाठी गर्दी, 49.67 टक्के मतदान
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 49.67 टक्के मतदान झाले. मात्र 2017मध्ये झालेल्या अमरावती पदवीधर निवडणुकीत 63.50 टक्के मतदान झालं होतं हे विशेष. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका कोणाला बसणार यासंदर्भात तर्क लढविण्यात येत आहे. अमरावती विभागात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यासह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही मतदान झाले. यापैकी सर्वाधिक 58.87 टक्के मतदान यवतमाळ येथे झाले आहे. तर अमरावतीमध्ये 43.37 टक्के, अकोलामध्ये 46.91 टक्के, बुलढाणामध्ये 53.04, वाशिम 54.80 टक्के मतदान झाले आहे.
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात 49.28 टक्के मतदान
नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत 49.28 टक्के मतदान झालं. आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. एकूणच पदवीधर मतदारांनी नाशिक निवडणूक मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणूकीची मतदान प्रक्रिया आज सुरळीतपणे पार पडली. ज्या पद्धतीने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून निवडणुकीचा ज्वर दिसून येत होता, त्या मानाने मतदारांनी तितकासा प्रतिसाद निवडणूक मतदानाला दिला नसल्याचे आजच्या निवडणूक मतदान आकडेवारी वरून स्पष्ट झाले. जवळपास अडीच लाखांहून अधिक मतदार असतांना अवघ्या 01 लाख 30 हजार मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. त्यामुळे आता 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दोन प्रबळ उमेदवार असलेल्या उमेदवारांचा कस लागणार आहे.