(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्राच्या मुलुख मैदानी महायुतीचा अतिप्रचंड विजय, भाजपला शिंदे,दादांची साथ; मविआचं आव्हान दुहेरी अंकांवरच शमलं!
Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल आता समोर आलेला आहे. यंदा महायुतीनेही बाजी मारली आहे.
Maharashtra Assembly Elections Results 2024 : लोकसभेचा कौल हाती आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुलुख मैदानी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections Results 2024) तयारी सुरु झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मागच्या काही वर्षांची गणितं पाहता, यंदाच्या निवडणुकांमध्ये अव्वल येणं इतकच ध्येय प्रत्येक राजकीय पक्षाचं होतं. त्यासाठी अगदी न भूतो न भविष्यती अशा प्रतिष्ठेच्या लढती महाराष्ट्राने पाहिल्या. पक्षांमधली फुट,बंडखोरी या सगळ्यानंतर आता महाराष्ट्राचा निकाल समोर आला आहे. राजकारणाच्या या मैदानात महायुतीने (Mahayuti) बाजी मारत महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) आव्हान केवळ दोन अंकांवरच शमवलं आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातली लक्षवेधी निवडणूक ठरल्याचं चित्र आहे.
महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या जागा यंदाच्या निवडणुकीत गमावल्या आहेत. तसेच सगळ्यात जास्त जागा मिळवून भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा महाराष्ट्रातील मोठा पक्ष ठरला आहे. काका-पुतण्या, बाप-लेक, नवरा-बायको अशी नात्यांचीही लढाई यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली.
कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या?
महायुतीमध्ये अजित पवार गटाने एकूण 52 जागा लढवल्या होत्या. यामध्ये बारामतीची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण बारातमधून अजित पवारांचा सख्खा पुतण्याच त्यांच्याविरोधात रिंगणात उतरला होता. पण युगेंद्र पवारांवर विजय मिळवत अजित पवारांनी त्यांचा बारातमतीचा किल्ला राखला. तसेच शिंदे गटाने एकूण 85 जागा लढवल्या होत्या. यामध्ये माहिमच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कारण या विधानसभा मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरे मैदानात होते. तसेच शिंदे गटानेही त्यांचा उमेदवार उतरवला होता. सदा सरवणकर हे शिंदे गटाकडून मैदानात होते. पण या लढतीमध्ये माहिमकरांनी कौल हा ठाकरे गटाचे उमेदवार महेश शिंदे यांच्या बाजूने दिला. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या भाजपने लढवल्या होत्या. भाजपने एकूण 149 जागांवर उमेदवार दिले होते.
महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा या काँग्रेसने लढवल्या होत्या. काँग्रेसकडून एकूण 103 जागांवर उमेदवार देण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठाकरे गटानेही 96 जागांवर त्यांचे उमेदवार दिले होते. त्यातील अनेक महत्त्वाच्या जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची सरशी झाली आहे. शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. त्यातील बारामतीची लढत ही पवार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाची झाली होती. कारण या मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होती.
कोणत्या जागांवर कुणाचे किती उमेदवार जिंकले ?
महायुतीमध्ये 132 जागांवर विजय मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे 57 आणि अजित पवार गटाचे 51 उमेदवार निवडून आले आहेत. लाडकी बहिण योजना हा यंदाच्या निवडणुकीत महायुतीसाठी महत्त्वाचा ठरलेला मुद्दा आहे. हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचं प्रेम अशा प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिल्यात.
महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे 20 उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीमधील सर्वाधिक उमेदवार असलेला पक्ष ठरला आहे. काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10 उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. लाडकी बहिण योजनेचं आव्हान, भाजपच्या कटेंगे तो बटेंगे नारा या सगळ्याचा फटका महाविकास आघाडीला बसला असल्याचं म्हटलं जातंय.