श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Shrirampur Assembly Constituency : भाऊसाहेब कांबळे आता बस्स झालं, प्रचारात माझा फोटो वापरू नका, तुम्ही विश्वासघात केलाय, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता.
अहिल्यानगर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) महायुतीत (Mahayuti) मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहे. श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे (Lahu Kanade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) दोन दिवसांपूर्वी केली होती. भाऊसाहेब कांबळे आता बस्स झालं, प्रचारात माझा फोटो वापरू नका, तुम्ही विश्वासघात केलाय, असा इशाराच त्यांनी दिला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी दिली आहे. त्यानंतर आता विखे पाटलांकडून शिंदे गट आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देण्यात आले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहित नाही. अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर महायुतीला फटका बसणार?
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसेल, असे मला वाटत नाही. दोन उमेदवार असले तरी जनता महायुतीसोबत आहे. जनतेला महायुतीच्या दोघांपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा संबंधच येणार नाही. महायुतीचे काम एवढे मोठे आहे की, जनता दुसऱ्या आघाडीचा विचारच करायला तयार नाहीत, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या