Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Maharashtra Assembly Elections 2024 : राहुल गांधींना सावरकरांबद्दल चांगलं बोलायला लावा, असे आव्हानदेखील अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
जळगाव : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केलाय. जळगाव येथे महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, आपल्याला येण्यास उशीर झाला. त्याबद्दल माफी मागतो. आजच्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महायुती सरकारला विजयी करा. महाराष्ट्राला देशातील एक नंबर राज्य बनविण्याचे स्वप्न आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र राहुल गांधी सावरकर यांचा विरोध करत आहेत, तुम्ही त्यांना समर्थन देणार का? राहुल गांधींना सावरकरांबद्दल चांगलं बोलायला लावा, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगलं बोलतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मविआ सत्तेत आली तर...
सत्तेच्या भुकेने महाविकास आघाडी अंध झाली आहे. पवारांसारख्या नेत्यांनी राम मंदिर अडकवून ठेवलं. मोदींनी पाच वर्षांत राम मंदिराचे काम सुरु केले. यंदा 550 वर्षानंतर रामलल्लाने दिवाळी अयोध्येत साजरी केली. औरंगाबादच्या नामांतराला देखील मविआने विरोध केला. कलम 370 हटवण्यासदेखील मविआने विरोध केला होता. वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणेला देखील मविआने विरोध केला. मात्र वक्फ बोर्ड कायद्यात बदल करायचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलंय. मविआ सत्तेत आली तर ते वक्फ बोर्डाच्या बाजूने निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
370 हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
आमची युती महाराष्ट्र समृध्द करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्याचे हे आश्वासन देत आहेत. ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. आरक्षण द्यायचे असेल तर आदिवासींचे, गरिबांचे आरक्षण कापून द्यावे लागेल, तुम्हाला हे मान्य आहे का? स्वातंत्र्यानंतर 370 हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. हा निर्णय घेतल्यावर विरोधक टीका करत होते. मोदी आल्यापासून अतिरेकी हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक करून उत्तर दिले आहे.
नाशिक-पुणे रेल्वेला आम्ही मंजुरी दिली
काँगेस काळापेक्षा मोदी सरकारच्या काळात राज्याच्या दहा लाख करोड रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या अगोदर एवढी मदत झाली नव्हती. विविध सरकारी विकास योजना, गरिबांसाठी योजना आणल्या. लाडकी बहीण योजना महिलांसाठी फायदेशीर असताना हे त्यालाही विरोध करत आहेत. मात्र पुन्हा महायुती सरकार आल्यावर 2100 रुपये रुपये देण्यात येतील. नाशिक-पुणे रेल्वेला आम्ही मंजुरी दिली आहे. 67 लाख गरिबांची बँक खाती उघडली आहे. 12.35 लाख गरिबांच्या घरी एलपीजी सिलेंडर पोहोचवले. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात उद्योग येत आहेत. वीस तारखेला कमळाला मतदान करणार का? आमच्या उमेदवारांना निवडून देणार का? पंतप्रधान मोदींची हात बळकट करणार का? असा सवाल करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देखील अमित शाह यांनी यावेळी केले.
आणखी वाचा