(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hitendra Thakur : भाजपनं एक डाव खेळला, हितेंद्र ठाकूर यांनी दुसरा डाव टाकला, डहाणू विधानसभेबाबत मोठा निर्णय
Hitendra Thakur : बहुजन विकास आघाडीनं डहाणू विधानसभा मतदारसंघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बविआचे डहाणूतील उमेदवार सुरेश पडवी यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
पालघर : एकीकडे भाजप नेते विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर बहुजन विकास आघाडीकडून पैसे वाटपाचे आरोप करण्यात येत होते. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पडवी यांनी मतदानाला एक दिवस बाकी असताना भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं एक डाव खेळल्यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांनी दुसरा डाव खेळला आहे. बहुजन विकास आघाडीनं डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी माकपचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
बहुजन विकास आघाडीचा विनोद निकोले यांना सशर्त पाठिंबा
बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.भाजपाने आमचा उमेदवार पळवल्याने आम्ही आता त्यांची जागा त्यांना दाखवून देणार असून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना सशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आहोत असं मत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे
बहुजन विकास आघाडीनं डहाणू विधानसभा मतदारसंघातून सुरेश पडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपला त्यांची जागा दाखवून देणार
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विनोद निकोले यांना सशर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी बहुजन विकास आघाडीनं भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचं म्हटलं आहे.
विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर विरार प्रकरणात एफआयआर
विरारमधील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्या विरोधात पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केला होता. विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला होता. या हॉटेलमध्ये साडे नऊ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली होती. या प्रकरणी चार एफआयआर दाखल करण्यात आल्या असून तीन एफआयआरमध्ये विनोद तावडे यांचं नाव असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी डहाणूच्या जागेसाठी विविध उमेदवारांनी पाठिंबा मागितल्याचं म्हटलं होतं. त्यामध्ये विनोद निकोले यांचा देखील समावेश होता. आता बहुजन विकास आघाडीनं डहाणू मतदारसंघातून विनोद निकोले यांना सशर्त पाठिंबा दिला आहे.
इतर बातम्या :