(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani Vidhan Sabha Elections Result : परभणीत राहुल पाटलांचा पुन्हा विजय, आनंद भरोसेंचं स्वप्न अधुरेच!
Prbhani Vidhan Sabha Election Result : परभणी हा मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
परभणी : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली होती. हे पक्ष पूर्ण ताकदीने कामाला लागले होते. दरम्यान, मराठवाड्यातील परभणी या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या जागेवरून कोण बाजी मारणार? याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या जागेसाठी महाविकास आघाडीने राहुल पाटील यांना तिकीट दिले होते. राहुल पाटील (Rahul Patil) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे नेते आहेत. असे असताना राहुल पाटील यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यांनी आनंद भरोसे यांचा पराभव केला आहे.
2024 सालच्या निवडणुकीचा नेमका निकाल काय?
परभणी या मतदारसंघात उद्धव ठाकेर यांच्या पक्षाचे राहुल पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंद भरोसे यांच्यात प्रमुख लढत झाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या दोन्ही नेत्यांत चुरस रंगली होती. मात्र शेवटी राहुल पाटील यांनी आनंद भरोसे यांचा तब्बल 34216 मतांनी पराभव केला. राहुल पाटील यांना एकूण 126803 मते मिळाली. तर आनंद भरोसे यांना 92587 मते मिळाली. नासीर सेख हे अपक्ष उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना एकूण 5442 मते मिळाली.
काँग्रेसच्या नेत्याने केली होती बंडखोरी
परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात नेहमीच शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळालेली आहे. 2019 साली परभणी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पंचरंगी झाली होती. ज्यामध्ये शिवसेनेकडून डॉ. राहुल पाटील यांना तिकीट मिळाले होते. काँग्रेस पक्षाकडून रविराज देशमुख हे मैदानात होते. 2019 साली वंचित बहुजन आघाडी या पक्षाची चर्चा होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून मोहम्मद गौस यांना उमेदवारी मिळाली होती. तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांनी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएम पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला होता. 2019 साली एमआयएमकडून अली खान यांनी निवडणूक लढवली होती.
कोणाला किती मतं मिळाली होती?
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील मिळाली होती. त्यांनी एकूण 104584 मते घेतली होती. जे जवळपास 81 हजार मतांच्या लीडने विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांना थेट 5 व्या क्रमांकावर जावे लागले होते. रविराज देशमुख यांना केवळ 15,580 मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता. मोहम्मद गौस यांना 22794 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे अली खान होते. त्यांना 22741 मते मिळाही तो. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांना 18,431 मत मिळाली होती.
यावेळच्या निवडणुकीत काय झाले?
परभणी मतदारसंघाची यावेळची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. या मतदारसंघात मुस्लीम, दलित मतांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे हे मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार? असे विचारले जात होते. दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही या मतदारसंघात महत्त्वाचा ठरला. परिणामी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणाऱ्या राहुल पाटील यांना जनतेने विजयाचा कौल दिला.
हेही वाचा :
Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?