Gangakhed Vidhan Sabha Elections Result : गंगाखेडमध्ये रासपच्या रत्नाकर गुट्टेंचा दणदणीत विजय, मविआच्या विशाल कदमांचा पराभव!
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या मतदारसंघातून कोण बाजी मारी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
परभणी : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धूम होती. निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले होते. विशेष म्हणजे राज्यातील अनेक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळच्या निवडणुकीत परभणीतील गंगाखेड हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून अनेक नेते उत्सूक होते. त्यामुळे या जागेवर नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विशाल कदम (Vishal Kadam) यांना पराभूत केले आहे.
2024 सालच्या निवडणुकीचा निकाल काय?
यावेळची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदारकीचे प्रमुख दावेदार समजले जात होते. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशीही प्रत्येक फेरीत ते प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर होते. शेवटी या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांनीच बाजी मारली. ते गंगाखेड मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार झाले आहेत. विशाल कदम दुसऱ्या तर सीताराम घनदाट हे तिसऱ्या स्थानावर राहिले.
रत्नाकर गुट्टे यांनी मारली होती बाजी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात (Gangakhed Vidhan Sabha Constituency Result ) 2019 सालाच्या अगोदर डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र 2019 सालच्या निवडणुकीत इथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला. त्यावेळी जवळपास पाच तगड्या उमेदवारांमध्ये निवडणूक रंगली होती. 2019 सालच्या निवडणुकीत रासपकडून रत्नाकर गुट्टे शिवसेनेकडून विशाल कदम तर वंचित बहुजन आघाडी कडून करुणा कुंडगीर हे उमेदवार होते. माजी आमदार सिताराम घनदाट यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता.
कोणाला किती मते मिळाली होती?
2019 सालच्या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांनी 81169 मतं घेऊन विजय मिळवला. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना 63,111 मतं मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार माजी आमदार सिताराम घनदाट यांना 52247 मतं मिळाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर यांना 28 हजार 837 मतं मिळाली होती. तर शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले संतोष मुरकुटे यांना 22955 मतं मिळाली होती. ते या निवडणुकीत पाचव्या स्थानी होते. राष्ट्रवादीचे मधुसदन केंद्रे हे पाचव्या स्थानी होते. त्यांना फक्त 8204 मते मिळाली होती.
हेही वाचा :
Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Jalna Vdhan Sabha Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?