Deolali Vidhan Sabha Constituency : देवळालीत ट्विस्ट पे ट्विस्ट! अजितदादांच्या उमेदवाराला पाठिंब्याचे शिवसेनेचे पत्र व्हायरल, शिंदे गटाच्या उमेदवार म्हणाल्या...
Maharashtra Assembly Election 2024 : देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतून अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आणि शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजश्री अहिरराव (Rajashree Ahirrao) यांना थेट हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवला. त्यामुळे शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्या नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे देवळालीत महायुतीत मैत्रापूर्ण लढत होणार, असे बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या व्हायरल पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीत पुन्हा गोंधळाचे वातावरण
शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज आहिरे या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊ चौधरी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे पत्र व्हायरल झाले आहे. भाऊ चौधरी यांच्या स्वाक्षरीचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे राजश्री अहिरराव निवडणुकीतून माघार घेणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र मी लढवण्यावर ठाम असल्याचे राजश्री अहिरराव यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या व्हायरल पत्राने देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीत पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हाचा वापर करू नये, या आदेशाचे निवडणूक आयोगाचे पत्र देखील व्हायरल झाले आहे.
देवळालीतून कोण बाजी मारणार?
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा रंगली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचे चिरंजीव योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे, तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून सरोज अहिरे की राजश्री अहिरराव की योगेश घोलप? कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा