Vidhan Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप फक्त एकच जागा लढवणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Vidhan Sabha Election 2024: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भाजपच्या वाट्याला फार कमी जागा येण्याचे संकेत मिळत आहेत. रवींद्र चव्हाण उत्तर न देता निघून गेले.
Maharashtra Assembly Election 2024: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपा (BJP) किती जागा लढणार? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकच जागा भाजपला दिली जाणार का? निलेश राणे (Nilesh Rane) यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार का? यासारख्या चर्चा सध्या कोकणात जोरात सुरू आहेत. दरम्यान, या चर्चांसंदर्भातल्या प्रश्नांना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिलेले उत्तर हे सूचक विधान तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ''भाजपचा कार्यकर्ता हा शिस्त आणि आदेश पाळणारा आहे. महायुती म्हणून निवडणुका लढवल्या जातील" अशा आशयाचे उत्तर रवींद्र चव्हाण यांनी भाजप रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये किती जागा लढवणार? या प्रश्नाला दिले. त्यामुळे आता विविध चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. यावेळी उदय सामंत (Uday Samnat) देखील पत्रकार परिषदेला हजर होते. तर निलेश राणे आणि यांच्या शिवसेना प्रवेशावरती केवळ धन्यवाद असे उत्तर देऊन रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
उत्तर देण्यासाठी उदय सामंत पुढे येत असताना आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे असे सांगून रवींद्र चव्हाण यांनी सामंत यांना देखील उत्तर देऊ नका, अशी एक प्रकारे सूचनाच केली. त्यामुळे सामंत यांनी देखील या प्रश्नाला उत्तर दिलेले नाही. दोन्ही नेत्यांनी उत्तर देणे टाळणे आणि रवींद्र चव्हाण यांनी दिलेले उत्तर यामुळे भाजप खरंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विधानसभेची केवळ एकच जागा लढवणार का? या प्रश्नाची उकल संभ्रमात टाकणारी आहे.
रत्नागिरीचं विधानसभेचं गणित काय?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत. पैकी केवळ नितेश राणे यांच्या रूपाने कणकवली इथं भाजपचा एक आमदार आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदार संघासाठी आग्रही आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता राजापूर मधून उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत तयारी करत आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ तर गुहागर मधून श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना रिंगणात शिवसेना उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दावा केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन जागांपैकी भाजपला किती जागा मिळणार? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यात रवींद्र चव्हाण यांच्या उत्तरानं संभ्रम वाढला आहे. पण, त्याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठ जागांचा विचार करता खरंच भाजपला केवळ एकच जागा मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर देखील अनुत्तरीत राहिल्यामुळे रंगणारा विविध चर्चांना दुजोरा तर मिळत नाही ना? असा आणखीन एक सवाल इथे उपस्थित होतो.
आणखी वाचा