Jalna Vihan Assembly Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?
Jalna Vihan Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घाडामोडींना वेग आला आहे. असे असताना जालना जिल्ह्यातून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jalna Vihan Assembly Election 2024 : स्टील सिटी, बियाणांची पंढरी, मोसंबी मार्केट आणि व्यापार पेठ अशी चौफेर ओळख असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्ष या निवडणुकीत जोमाने कामाला लागलेत. संमिश्र सामाजिक स्थिती आणि बदलत्या राजकीय स्थितीमुळे जालना विधानसभा मतदारसंघ आतापर्यंत कोणाचाही बालेकिल्ला होऊ शकलेला नाही. 70 टक्के शहरी 30 टक्के ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) अशीच दुहेरी लढत होत आलेली आहे. तेव्हापासून आलटून पालटून या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. आजसुद्धा हीच परिस्थिती असली तरी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (MahaYuti) या दोन्ही पक्षांमध्ये काहीशी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
मविआ आणि महायुती यांच्यातील सद्यस्थिती
महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. पण काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांनी देखील दावा ठोकल्यामुळे काँग्रेसमध्येच ओढतान पाहायला मिळत आहे. कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाल्यावर अब्दुल हफिज अपक्ष उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास मतदारसंघातील मोठा टक्का असलेला मुस्लीम समाज विभागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोडीला बहुजन वंचित आघाडीने डेव्हिड घुमारे यांना तिकीट जाहीर केल्याने दलित, मातंग समाज बहुजन वंचित आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मविआमधील धुसफुस आणि बदललेली राजकीय समीकरणे काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकतात.
महायुतीकडून खोतकर यांना उमेदवारी
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात सहभागी झालेल्या अर्जुन खोतकर जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेनेने खोतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे तसेच भाजप नेते अशोक पांगारकर हे भाजपकडून इच्छुक होते. त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची माजी आमदार अरविंद चव्हाण देखील, या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते.
जालना मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित
सद्यस्थितीत बदललेली राजकीय समीकरणं, विकासकामांचा अनुशेष, पायाभूत सुविधांचा अभाव, वाढती गुन्हेगारी, सिंचनाचे प्रश्न, या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात चर्चेचे प्रमुख चर्चेचे मुद्दे आहेत. सर्वच पक्षांकडून स्वतःच्या कामाची प्रशंसा होताना पाहायला मिळत आहे. या जोडीला जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच कमी आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात इतर मुद्द्याप्रमाणे सहज घेतला जाण्याची शक्यता आहे.
2019 विधानसभा स्थिती
2019 विधानसभेमध्ये विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली होती. मागच्या वेळी भाजप स्वतंत्र लढल्यामुळे अर्जुन खोतकर यांना फटका बसला होता. त्यामुळेच खोतकर यांचा या जागेवर भराभव झाला होता.
2019 निकाल:-
कैलास गोरंट्याल काँग्रेस 91835 मते.
अर्जुन खोतकर (शिवसेना)-66497 मते.
हेही वाचा :
Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?