Laxman Pawar : आमदार लक्ष्मण पवार यांनी निर्णय फिरवला, कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण, गेवराईतून अपक्ष लढणार, बीडमध्ये नवा ट्विस्ट
Laxman Pawar : भाजपचे गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं होतं.
बीड : भाजपचे गेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातून दोन आमदार विजयी झाले होते. त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजपचे लक्ष्मण पवार गेवराई मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले होते. गेल्या महिन्यात लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर होताच लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
लक्ष्मण पवारांकडून कार्यकर्त्यांची मागणी मान्य, निर्णय फिरवला
भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. बीडच्या गेवराई विधानसभा मतदार संघातून महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांची मात्र मोठी अडचण झालीय. स्वपक्षीय नेत्यांवर आरोप करत आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवस ते शरद पवारांच्या संपर्कात होते. मात्र, महाविकास आघाडीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
लक्ष्मण पवार यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली या बैठकीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणूक लढवण्यासाठी कमी दिवस राहिले आहेत. प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करणार असल्याचं म्हटलं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन कशा प्रकारे प्रचाराचं नियोजन करायचं, हे ठरवणार आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं लक्ष्मण पवार म्हणाले.
महाविकास आघाडी कडून बदामराव पंडित तर महायुतीकडून विजयसिंह पंडित या काका पुतण्यामध्ये लढत होणार आहे. तर मनसेने मयुरी मस्के, वंचितने प्रियंका खेडकर यांना उमेदवारी दिलीय. एकंदरीतच गेवराई विधानसभा मतदारसंघात यंदा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढत होईल. तर पंडित आणि पवार या कुटुंबात देखील ही लढत होणार आहे.
लक्ष्मण पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. याशिवाय पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करुन देखील त्यांनी लक्ष दिलं नव्हतं, असं म्हटलं. लक्ष्मण पवार यांनी काही दिवसांपूर्वी मी पक्षावर नाराज नाही, असं म्हटलं होतं. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल सांगूनही कारवाई झाली नाही म्हणून हाताश होत मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं लक्ष्मण पवार म्हणाले होते. पंकजाताई मुंडे यांना अनेक वेळा वेळ द्या म्हणून सांगितले. मात्र, पंकजाताई यांनी कधीच वेळ दिला नाही. त्या सतत मुंबईत राहायच्या.इथे भाजप कार्यकर्त्यांवर खूप अत्याचार झाला, असं लक्ष्मण पवार गेल्या महिन्यात म्हणाले होते.
इतर बातम्या :