Rajendra Raut Wealth: मनोज जरांगेंना नडले, भिडले, आता निवडणुकीच्या रिंगणात; बार्शीचे राजेंद्र राऊत किती कोटींचे मालक? संपत्ती किती?
भाजपच्या तिकिटावर 2019 मध्ये निवडून आलेले बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Rajendra Raut: 'खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत आलात तर याद राखा..' असं म्हणत थेट मराठा आरक्षणाच्या वादळात उडी घेत मनोज जरांगेंना अंगावर घेणारे बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत सादर केलेल्या शपथपत्रानुसार राजेंद्र राऊत यांच्या जंगम मालमत्तेत 2019 च्या तुलनेत मोठी घट झाल्याचं दिसतंय. मात्र, स्थावर मालमत्तेत कोट्यवधींची वाढ झाली आहे.
2019 च्या तुलनेत किती आहे राऊतांची मालमत्ता?
भाजपच्या तिकिटावर 2019 मध्ये निवडून आलेले बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत सादर केलेल्या शपथपत्रानुसार राजेंद्र राऊतांची जंगम मालमत्ता गेल्या विधानसभेच्या तुलनेत घटल्याचे दिसून आले. मात्र, स्थावर मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. 2019 मध्ये राजेंद्र राऊत यांच्याकडे 17 कोटी 13 लाख 39 हजार 498 रुपयांची जंगम मालमत्ता होती. 2024 मध्ये मात्र त्यांच्याजवळ 12 कोटी 40 लाख 95 हजार 249 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. म्हणजे सुमारे चार कोटी 72 लाख 44 हजार 289 रुपयांची घट राऊत यांच्या जंगम मालमत्तेमध्ये झाली आहे.
स्थावर मालमत्तेत कोट्यवधींची वाढ
जंगम मालमत्ता घटली हे जरी असे असले तरी राजेंद्र राऊत यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये 10 कोटी 71 लाख 98 हजार 637 रुपयांची स्थावर मालमत्ता राजेंद्र राऊत यांच्या मालकीची होती. 2024 मध्ये राऊत यांच्याकडे 35 कोटी 51 लाख 88 हजार 794 रुपयांची मालमत्ता आहे. म्हणजे सुमारे 24 कोटी 79 लाख 90 हजार 157 रुपयांची मालमत्तेमध्ये वाढ झाली आहे. राऊतांकडे स्थावर आणि जंगम मिळून 38.44 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. जी 2019 मध्ये 24.92 कोटी एवढी होती.
मागील पाच वर्षात कर्जामध्येही वाढ
मागील पाच वर्षात राजेंद्र राऊत यांच्यावरील कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2019 मध्ये राऊत यांच्यावर 16 कोटी 33 लाख 34 हजार 618 रुपयांचे कर्ज होते. त्यामध्ये सुमारे 15 कोटी 91 लाख रुपयांची वाढ होऊन 2024 मध्ये त्यांच्यावर सध्या 32 कोटी 24 लाख 56 हजार 650 रुपयांचे कर्ज आहे. 2019 मध्ये त्यांच्यावर चार गुन्हे प्रलंबित होते. मात्र सध्या त्यांच्यावर तीन गुन्हे प्रलंबित आहेत. राऊतांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या 7 एवढी आहे.
पत्नीकडे किती सोनं?
राजेंद्र राऊत यांची पत्नी कविता राऊत यांच्या नावावर 40 तोळे सोनं, 1 कोटी 99 लाख रुपयांची जंगम मालमत्ता तर 6 कोटी 88 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावावर घेतलेले कर्ज 4 कोटी 81 लाख रुपये एवढे आहे. शिवाय राजेंद्र राऊत यांच्याकडे बुलेट आणि फॉर्च्यूनर ही वाहने आहेत.