Ambegaon Assembly Election 2024: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधात त्यांचाच कट्टर समर्थक; 1990 पासूनची विजयाची हॅट्रीक वळसे साधणार? मतदारसंघाने वेधलं लक्ष
Ambegaon Assembly Election 2024: दिलीप वळसे पाटील 1990 पासून आमदार आहेत. पुन्हा एकदा ते विजयाची हॅट्रीक साधणार की मतदारसंघ हातातून जाणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ambegaon Assembly Election 2024: आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, पक्षातील फुटीनंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे आता लक्ष्य लागलं आहे. विद्यमान सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात तळागाळापर्यंत जनसंपर्क आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील 1990 पासून आमदार आहेत.
आंबेगाव विधानसभेतील राजकीय वर्चस्वाबद्दल सांगायचं तर, 1972 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने 5 वेळा आणि काँग्रेस पक्षाने 3 वेळा या जागेवरून निवडणूक जिंकली आहे. याशिवाय गेल्या 5 निवडणुकांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली असून दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. 2019 च्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेचे राजाराम भिवसेन बाणखेले यांचा 66775 मतांनी पराभव केला होता. आंबेगाव येथे गेल्या विधानसभा निवडणुकीत 66.35 टक्के मतदान झाले होते.
आंबेगावमध्ये कोणाचं वर्चस्व?
दिलीप वळसे पाटील 1990 पासून आमदार आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील गेल्या 3 निवडणुकीची स्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलग तीन वेळा विजयी झाले असले, तरी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात बरेच बदल झाले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील हे अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते. मात्र आता या विधानसभेला पक्षातील फुट आणि निर्णय यामुळे काही फटका बसणार की पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हॅट्रीक साधणार याकडे लक्ष्य आहे. शरद पवार यांच्याप्रती जनतेत सहानुभूतीची लाट निर्माण झाल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, पण या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचीही महत्त्वाची भूमिका राहणार आहे. अशातच या जागेची निवडणूक तराजूवर आहे.
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षफुटीआधी देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिल्यामुळे आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात रंगतदार सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.