खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ | शिवसेनेच्या सुरेश गोरेंच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडणार?
खासदार अमोल कोल्हेंच्या रूपानं खेड-आळंदी विधानसभा काबीज करण्याचे मनसुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चाकण मराठा क्रांती मोर्चाचे हिंसक आंदोलन हा प्रचारातील कळीचा मुद्दा राहील.
खेड-आळंदी विधानसभेची निर्मिती 2009 साली झाली. पहिल्या विधानसभेत येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते तर नंतर 2014 च्या विधानसभेत शिवसेनेचे सुरेश गोरेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. आता 2019 विधानसभेत मात्र शिवसेनेला हा गड राखण्यासाठी जंगजंग पछाडावी लागणार आहे. कारण 15 वर्षांपासून शिवसेनेच्या हाती असणारी शिरुर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने खेचली आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चाचे हिंसक आंदोलन, त्याआधीच बैलगाडा शर्यतीसाठी झालेलं आंदोलन आणि वाहतूक कोंडी फोडताना विद्यमान शिवसेना आमदारांकडून रिक्षा चालकाला झालेली मारहाण या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडत आहे. ही प्रकरण युतीला भोवण्याची शक्यता आहे.
खेड-आळंदी हा मतदारसंघ पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा पसरला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी, निमगाव-दावडीचा खंडोबा, कन्हेरसरची देवी अशी तीर्थक्षेत्र. भामा-आसखेड आणि चासकमान ही धरणं. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे किल्ला असा ऐतिहासिक वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. या मतदार संघातील चाकण औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने राज्य-परराज्यातून मोठ्या संख्येने नोकरदार स्थायिक झाला आहे. निमशहरी या भागात शेतकऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला ऐतिहासिक वाहतूक कोंडीही लाभली आहे.
2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप मोहितेंच्या रूपाने आमदार मिळवला. मोहितेंकडून मतदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण मतदारांना गृहित धरत, मोहितेंनी सर्वांचा भ्रमनिरास सुरु ठेवला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकमांना मताधिक्य मिळवून देतील अशी अपेक्षा होती. पण तिथे ही अपेक्षांचा भंग झाला आणि शिवसेनेच्या शिवाजी आढळरावांच्या बाजूने मतदार झुकले. मतदारांचा झालेला भ्रमनिरास 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अखेर मोहितेंना भोगावा लागला आणि त्यामुळेच शिवसेनेच्या सुरेश गोरेंकडून त्यांचा दारुण पराभव झाला. आता मतदार गोरेंकडे अपेक्षेने पाहू लागले.
अशातच चाकणच्या मुख्य चौकात मराठा क्रांती मोर्चाचं हिंसक आंदोलन पार पडलं. याप्रकरणी हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण सत्ताधाऱ्यांना महागात पडणारं होतं. म्हणूनच चौकशीत राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि इच्छुक उमेदवार दिलीप मोहितेंवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी चर्चा मतदार संघात रंगू लागली. म्हणूनच की काय न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून ही पोलिसांनी अद्याप ही मोहितेंना अटक केलेली नाही. दरम्यान शिवसेनेचे विद्यमान आमदार गोरेंनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा ही दाखल झाला आणि गोरेंची अडचण वाढली.
या पार्श्वभूमीवर 2019 ची शिरूर लोकसभा निवडणूक पार पडली. अमोल कोल्हेंच्या रुपाने खेळलेला डाव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडला. कोल्हेंनी 7 हजार 446 मतांनी आघाडी मिळवत विद्यमान खासदार शिवाजी आढळरावांचा त्रिफळा उडवला. मतदारांनी हे मताधिक्य कोल्हेंच्या पदरी टाकलं, यात राष्ट्रवादी काँग्रेसने श्रेय घेणं चुकीचं राहील. पण कोल्हेंच्या रूपानं खेड-आळंदी विधानसभा काबीज करण्याचे मनसुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चाकण मराठा क्रांती मोर्चाचे हिंसक आंदोलन हा प्रचारातील कळीचा मुद्दा राहील. म्हणूनच की काय राष्ट्रवादीच्या मोहितेंवर गुन्हा दाखल करण्याची खेळी आखली गेली. पण ती मतदारांच्या कितपत पचनी पडेल. हे निकालातून स्पष्ट होईल.
2019 च्या शिरूर लोकसभेतील खेड-आळंदी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 92 हजार 138 डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 99 हजार 583 (विजयी)